घरमहाराष्ट्रनाशिक'२० दिवसांत खड्डे भरा, नाहीतर अधिकाऱ्यांची खैर नाही'

‘२० दिवसांत खड्डे भरा, नाहीतर अधिकाऱ्यांची खैर नाही’

Subscribe

पावसाळ्यानंतरही नाशिककरांना खड्ड्यांशी सामना करावा लागत असून त्यामुळे अनेकांना मणक्यांशी संबंधित आजार जडले आहेत. ही बाब लक्षात घेऊन स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी बांधकाम विभागातील अधिकार्‍यांची मंगळवारी स्वतंत्र बैठक घेत येत्या पाच दिवसांत म्हणजे ९ नोव्हेंबरपर्यंत शहरातील खड्डे बुजविण्याचे नियोजन करुन येत्या २० दिवसांत खड्डेमुक्त शहर करण्याचे आदेश दिले. विहीत कालावधीत शहर खड्डेमुक्त न झाल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

‘रस्त्यावर एकही खड्डा दिसायला नको’

पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांना खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांना अपघात आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर महापालिकेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. या सर्व बाबींची दखल घेत सभापती उद्धव निमसे यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या सर्वच अभियंत्यांची आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी प्रत्येक उपअभियंत्यांकडे सोपवण्यात आलेल्या प्रभागातील रस्ते आणि त्यावरील खडड्यांची बारकाईने माहिती घेतली. केवळ खड्डेच नव्हे, तर रस्त्यांच्या साईडपट्टया आणि खड्डे बुजविण्याची पद्धत कशी असावी? याबाबतही उपअभियंत्यांची कानउघडणी केली. सर्वच उपअभियंत्यांनी ९ नोव्हेंबरपर्यंत आपापल्या भागातील रस्त्यांचा अहवाल तयार करायचा आहे. त्यानंतर २० दिवसांत म्हणजे ३० नोव्हेंबरपर्यंत रस्त्यांवर एकही खड्डा दिसता कामा नये, अशी सूचना करत खड्डे दिसून आल्यास किंवा तीन वर्षांत पुन्हा उखडल्यास अशा अभियंत्यांची खैर नाही, अशी तंबीच निमसे यांनी बैठकीत दिली.

- Advertisement -

कोल्ड मिक्स पद्धतीनेच खड्डे बुजवावेत

साधारणपणे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर तीन वर्ष त्याची देखभाल दुरूस्ती ठेकेदाराकडे असते. अशा तीन वर्ष झालेल्या रस्त्यांचीही त्यांनी माहिती घेतली. बैठकीस उपस्थित असलेल्या नगरसेविका कल्पना पांडे यांनी प्रभागातील रस्त्यांची बिकट झालेली अवस्था आणि तीनच महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेला रस्ता वाहून गेल्याची तक्रार केली. यावर रस्त्यांची अशी कामे होणार असतील तर उपअभियंत्यांवर तर कारवाई होईलच, परंतु, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे सांगितले. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात झाले आणि सिंहस्थात झालेल्या रस्त्यांची कामे अभियंत्यांनी पहावी, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी महात्मा गांधी रोडच्या काँक्रीट रस्त्याचाही उल्लेख केला. नगरसेविका पांडे यांच्या प्रभागातील रस्त्यांची माहिती घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. खड्डे बुजवताना मुरूम, विटा, दगड आणि खडीचा वापर केला जातो. यामुळे खड्डे दुरूस्त न होता आणखी त्यात वाढ होते. मुरूमऐवजी कोल्डमिक्स वापरणे का बंद केले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर अभियंत्यांना उत्तर देता आले नाही. यापुढे कोल्डमिक्स पद्धतीने खड्डे बुजवण्यात यावे आणि ते रस्त्याच्या लेअरप्रमाणेच बुजवण्याची सूचना करण्यात आली. तीन वर्षांच्या आत खड्डा तयार झाल्यास त्याची जबाबदारी कंत्राटदार आणि अभियंत्यांची असेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

.. तर ठेकेदार काळ्या यादीत; अधिकारी निलंबित!

तीन वर्षांपूर्वी बांधलेले रस्ते दुरुस्त करण्याचे दायित्व संबंधित ठेकेदारांचे असते. मात्र, ठेकेदार कर्तव्यात कसूर करीत असल्यास त्यांना काळ्या यादीत टाकून संबंधित अभियंत्यांवरही निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचना सभापती निमसे यांनी यावेळी दिल्या.

- Advertisement -

व्हॉटसअ‍ॅपवर फोटो टाकण्याचे आदेश

ठेकेदाराकडून काम योग्य रीतीने होत आहे की नाही? याची अभियंत्यांनी सकाळी आणि सायंकाळी पाहणी करून त्याचे छायाचित्र व्हॉटसअ‍ॅपवर टाकण्याची सूचना सभापती निमसे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -