घरताज्या घडामोडीनाशिक तापमान @ ६, निफाड @२.४

नाशिक तापमान @ ६, निफाड @२.४

Subscribe

शहर व जिल्ह्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला असून शुक्रवारी (दि.१७) किमान तापमान ६ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. यामुळे सलग दुसर्‍या दिवशी नाशिक राज्यातील सर्वात थंड शहर ठरले असून निफाडमध्ये २.४ तापमानाची नोंद झाली आहे. यावर्षी पहिल्यांदाच नागरिक कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. दरम्यान या थंडीबरोबर धुके नसल्याने सकाळच्या उन्हात उभे राहून नागरिक या थंडीचा आनंद लुटत आहे.

नाशिक हे राज्यातील थंड ठिकाणांपैकी एक असून हिवाळ्यात बहुतांश दिवस राज्यातील सर्वात थंड शहर म्हणून त्याची नोंद होत असते. यावर्षी थंडीचे प्रमाण कमी असल्यामुळे १५ जानेवारीपर्यंत चांगल्या थंडीची प्रतीक्षा होती. गेले दोन दिवसांपासून एकदम तापमानात घट आल्याने थंडीचा जोर वाढला असून सायंकाळपासूनच नाशिकचे रस्ते ओस पडू लागले आहेत. ही वाढती थंडी रब्बीच्या पिकांना पोषक असली तरी थंडी लांबल्यावर मात्र त्याचा फळपिकांवर परिणाम होऊ शकतो, असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. तापमान १० अंशाच्या खाली सलग काही दिवस राहिल्यानंतर पांढर्‍या मुळ्या तयार होण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पानांचे अन्नद्रव्य तयार करण्याचे कार्य मंदावून फळांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या सलग थंडीच्या काळात पहाटेच्या वेळी पाणी देणे, रात्री बागांमध्ये शेकोटी पेटवणे आदी कामे शेतकर्‍यांना करावी लागतात. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच थंंडीचा जोर वाढल्याने अजून तरी पिकांना ही थंडी त्रासदायक नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही थंडी अजून काही दिवस राहणार आहे.

सायंकाळीच रस्ते ओस

दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्याने गुरुवारी (दि.१७) व शुक्रवारी (दि.१८) सायंकाळीच रस्ते ओस पडल्याचे दिसून आले. या थंडीचा जोर वाढल्यामुळे व्यावसायिकही लवकरच घर गाठत आहेत. तसेच ग्रामीण भागातही शेतकर्‍यांना या थंडीपासून पाळीव जनावरांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागत आहेत. दरम्यान संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी निघालेल्या बहुतांश दिंड्या शुक्रवारी (दि.१७) नाशिक शहरात मुक्कामी आल्या आहेत. या दिंड्यांच्या निवार्‍याची शहरातील नागरिकांनी सुविधा केली असून त्यांच्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब तयार केली जात असल्याचेही दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -