घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकची लढत पंचरंगी?

नाशिकची लढत पंचरंगी?

Subscribe

नाशिक निवडणुकीत यंदा अधिक चुरस बघायला मिळणार असून नाशिक मतदार संघात तब्बल पाच मोठे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील असे चित्र आहे.

नाशिक निवडणुकीत यंदा अधिक चुरस बघायला मिळणार असून नाशिक मतदार संघात तब्बल पाच मोठे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील असे चित्र आहे. त्यात काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने समीर भुजबळ, शिवसेना- भाजप युतीच्या वतीने खासदार हेमंत गोडसे, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पवन पवर यांच्यासह अपक्ष म्हणून माजी आमदार माणिकराव कोकाटे आणि मराठा क्रांती मोर्चात महत्वाची भूमिका बजाविणारे करण गायकर यांनी उमेदवारीची तयारी केली आहे. याशिवाय माजी महापौर दशरथ पाटील हे देखील निवडणूक लढविण्याच्या मानसिकतेत असून ते आपली भूमिका मंगळवारी २६ मार्चला जाहीर करणार आहेत.

गेल्या निवडणुकीत प्रामुख्याने चौघांनी नशिब आजमावले होते. त्यात युतीच्या वतीने हेमंत गोडसे, आघाडीच्या वतीने समीर भुजबळ, मनसेच्या वतीने डॉ. प्रदीप पवार आणि आम आदमी पक्षाच्या वतीने विजय पांढरे यांचा समावेश होता. यात गोडसे यांना ४ लाख ९४ हजार ७३५, भुजबळ यांना ३ लाख ७ हजार ३९९ तर डॉ. पवार यांना ६३ हजार ५० मते मिळाली होती. यंदा मात्र पाच जणांनी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. त्यात गोडसे यांना युतीने उमेदवारी जाहीर केल्याने भारतीय जनता पार्टीकडून इच्छूक असलेले माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी बंडाचा झेंडा फडकवित अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे. नाशिक मतदारसंघात भाजपने मला उमेदवारी देऊन मैत्रीपूर्ण लढतीचा प्रयोग करावा, अशी अपेक्षा कोकाटे यांनी व्यक्त केली असली तरीही ती पूर्ण होण्याची सुतारामही शक्यता नाही. मात्र कोकाटे यांच्या उमेदवारीने गोडसे यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकाटेंना थांबविण्यासाठी युतीच्या पदाधिकार्‍यांना अथक मेहनत घ्यावी लागणार आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या गळ्यात पुन्हा एकदा उमेदवारीची माळ पडली आहे. तर वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने पवन पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पवन पवार यांनी आपले लक्ष्य शिवसेना- भाजप युतीचा उमेदवार असल्याचे यापुर्वीच स्पष्ट केले असले तरीही त्यांची उमेदवारी आघाडीची मते कमी करण्यात कारणीभूत ठरेल असे मानले जात आहे.

- Advertisement -

मराठा मोर्चात महत्वाची भूमिका बजावणारे करण गायकर हे देखील अपक्ष म्हणून यंदा नशिब आजमावत आहेत. केबीसी घोटाळ्यातील गुंतवणूकदारांचा लढा उभा करणारे गायकर शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या आंदोलनामुळे चर्चेत आले आहेत. छावा क्रांतीवीर संघटनेच्या जोरावर ते निवडणूक लढविणार आहेत. जातीय समीकरणांच्या अनुषंगाने गायकर यांच्या उमेदवारीचा फटका हेमंत गोडसे यांनाच बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय माजी महापौर दशरथ पाटील हे देखील लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. सोशल मीडियावर दिलेल्या क्रमांकावर आपण निवडणूक लढवावी यासाठी ६ हजार ३०० मिस कॉल प्राप्त झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. येत्या मंगळवारी निवडणुकीविषयी आपली भूमिका स्पष्ट करु असे त्यांनी जाहीर केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -