सिन्नरच्या सलून खुर्चीला राजकीय ‘कात्री’

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत सदस्या कोकाटे यांचा अध्यक्षांवर आक्षेप

Nashik

जिल्हा परिषद सदस्यांच्या हिश्याला असलेल्या सेस निधितून अध्यक्षा शीतल सांगळे यांनी सिन्नर तालुक्यातील 236 सलून चालकांना खुर्च्यांचे वाटप केले आहे. प्रत्येक सदस्याला 21 लाख रुपये सेस निधी मिळालेला असताना अध्यक्षांनी परस्पर 30 लाख रुपयांच्या खुर्च्या का वाटल्या? हा इतर सदस्यांवर अन्याय असल्याचे सांगत त्यांच्या राजकीय विरोधक तथा देवपुर (ता.सिन्नर) गटाच्या सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी राजकीय उट्टे काढण्याचा प्रयत्न केला. दहा हजारांत आयएसआय नामांकित खुर्च्या मिळत असताना 13 हजार रुपयांची खुर्ची घेण्यात कोणाचे स्वारस्य आहे, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अधिकार्‍यांना तत्काळ याविषयी खुलासा करण्याचा आग्रह धरल्याने सिन्नरची सलून खुर्ची आता राजकीय कात्रीत सापडली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.11) कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही अंतिम सभा असल्याने बहुतेक सदस्यांनी हजेरी लावली. वार्षिक 48 कोटींचे बजेट असलेल्या जिल्हा परिषदेतील विविध अस्थापना खर्च व योजनांचे दायित्व वगळता उर्वरीत निधी (सेस) सदस्यांना दिला जातो. यावर्षी सदस्यांना 21 लाख रुपये सेस मिळाला असून त्यातून अध्यक्षा शीतल सांगळे यांनी सिन्नर तालुक्यातील 236 सलून चालकांना खुर्च्यांचे वाटप केले. लाभार्थ्याने खुर्ची खरेदी केल्यानंतर ग्राम पंचायत विभागातर्फे त्यांच्या बँक खात्यावर 13 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. खुर्ची खरेदी केल्याची पावती त्यांना जमा करावी लागणार आहे. मात्र, यापेक्षा कमी किमतीत आयएसआय नामांकन मिळालेल्या खुर्च्या मिळतात, त्यामुळे 13 हजार रुपयांचा खर्च का करण्यात आला? असा प्रश्न कोकाटे यांनी सभागृहात उपस्थित केला. याविषयी सलूनवाल्यांना आर्थिक भुर्दंड बसल्याच्या तक्रारी माझ्याकडे केल्या आहेत. खुर्च्या वाटप करताना काय नियम आहेत? याविषयी अधिकार्‍यांनी तत्काळ खुलासा करण्याचा आग्रह त्यांनी धरला. या विषयाला राजकीय स्वरुप दिले जात असल्याचे लक्षात येताच अध्यक्षा सांगळे यांनी लागलीच मध्यस्थी करत तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल, तुर्त हा विषय मंजूर करुन घ्या, असे आश्वासन दिले.

मध्यंतराच्या सुटीनंतर कोकाटे यांनी पुन्हा हाच विषय उपस्थित करत अधिकार्‍यांना फेरविचारणा केली. ग्राम पंचायत विभागाचे तत्कालिन उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शळकंदे यांनी याविषयी सविस्तर खुलासा केला. ‘आयटीआय’ची तांत्रिक समिती ही खुर्च्यांचा दर्जा निश्चित करते. त्यांच्या मान्यतेनुसार आपण साहित्य खरेदी करतो. वैयक्तिय लाभाची ही योजना असल्यामुळे यासाठी अंदाजपत्रक मागण्यात आलेले नाही. खरेदीची पावती सादर करणार्‍या लाभार्थ्यांनाच ‘डीबीटी’द्वारे 13 हजार रुपये दिले जाणार असल्याचे शेळकंदे यांनी खुलासा केला. खुर्ची खरेदीची योजना बारगळत असल्याचे लक्षात येताच निफाड तालुक्यातील सदस्यांनी त्यावर आक्षेप नोंदवत या योजनेच्या लाभार्थ्यांना खुर्ची खरेदीची रक्कम 13 हजार रुपयेच ठेवण्याचा आग्रह धरला. तसेच कोकाटे यांनी मांडलेल्या सूचनांच्या आधारे यापुढे खरेदी करण्याचा निर्णय घेत, हा विषय मंजूर करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष नयना गावित, सभापती मनिषा पवार, सुनिता चारोस्कर, अर्पणा खोसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांसह सदस्य व अधिकारी उपस्थित होते.

ग्रामसेवक चौधरी निलंबित

घोटी (ता.इगतपुरी) येथील ग्रामसेवक सुनील चौधरी हा महिलांच्या अंगावर धावून गेला. तसेच येथील ठोळे कुटुंबियांना धक्काबुक्की केल्यामुळे गावातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. महिलेस धकमावणार्‍या या ग्रामसेवकास तत्काळ निलंबित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव यांनी केली. सीईओ भुवनेश्वरी एस. यांनी या प्रकरणाची चौकशी करुन त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तथापि, चौधरी हे जामनेर येथील रहिवाशी असल्याने पालकमंत्री गिरीश महाजन यांचा वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here