घरताज्या घडामोडी‘निसर्ग’ने उडवली दाणादाण : नाशिक जिल्ह्यात १९१ हेक्टरवरील पिकांना तडाखा

‘निसर्ग’ने उडवली दाणादाण : नाशिक जिल्ह्यात १९१ हेक्टरवरील पिकांना तडाखा

Subscribe

जिल्ह्यात ६६ मिलीमीटर पावसाची नोंद ; २५० घरांचे नुकसान, तर ५६ जनावरे दगावली

जिल्ह्यात बुधवारी रात्री धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाने इगतपुरी, नाशिक, सिन्नर, येवला, मालेगाव तालुक्यांना जोरदार तडाखा दिला. दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या, रात्री आठ वाजेनंतर मात्र पावसाचा जोर अधिकच वाढला. रात्रभर वादळासह मुसळधार पावस बरसला. यामुळे जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपर्यंत ६६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाने शहरात अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर जिल्ह्यात ठिकठिकाणी १९१ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तवला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशदेखील प्रशासनाने दिले आहेत.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा तडाखा नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला बसला. हे चक्रीवादळ अलिबागमार्गे, मुंबईत दाखल होणार होते. मात्र, दुपाननंतर या वादळाने दिशा बदलत ते नाशिकच्या दिशेने फिरले. इगतपुरी, देवळाली, शिंगवे बहुलासह आसपासच्या गावांना या वादळाचा तडाखा बसला. तालुक्यातील राहुरी येथे वीजेचा शॉक लॉगून दोन महिलांच मृत्यू झाला. सिन्नर, निफाड आणि येवला तालुक्यातील काही गावांमध्ये या वादळाने झोडपले. वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस, वीजपुरवठा खंडीत होणे, पत्रे उडणे, झाडे उन्मळून पडणे यासारखे प्रकार घडल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली.

- Advertisement -

येवला तालुक्यातील अंदरसुल येथील गजानन देशमुख यांच्या पोल्ट्री फामर्र्चे मोठे नुकसा होऊन शेडमधील सुमारे १५०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या. सिन्नर तालुक्यात अतिवृष्टी झाली. दिवभरात १११ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. इगतपुरी तालुक्यातही १०६ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. प्रशासनाने यापूर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून दोन हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्याचप्रमाणे निफाड, मनमाड, मालेगाव, दिंडोरी तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या वादळामुळे जिल्ह्यातील १९१ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले. यात सिन्नर तालुक्यात १३८.८ हेक्टर, नाशिक तालुक्यात ३८ हेक्टर, चांदवड १.२ हेक्टर, इगतपुरी ११ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील २१ पॉली हाउस, पोल्ट्री, गोठे, कांदाचाळीचे नुकसान झाले आहे. नाशिक शहरातदेखील रविवार कारंजा, भद्रकाली भागातील पडक्या वाड्याची भिंत कोसळली. शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने शहरासह उपनगरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. गुरुवारी दिवसभर शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

घरांची पडझड, जनावरेही दगावली
या वादळामुळे १८७ कच्ची घरे तर ६४ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान झाले. सात झोपड्यांचेही नुकसान झाले. घरांचे पत्रे उडणे, भिंत कोसळणे अशा घटना घडल्या सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तर ५६ जनावरे दगावली. यात बागलाण तालुक्यात ३६ जनावरे दगावली. कळवण ५, नांदगाव २, येवला ३, नाशिक ५, दिंडोरी, सिन्नर, मालेगाव , चांदवड तालुक्यात प्रत्येकी १ पशुधनाची हानी झाली.

- Advertisement -

आठ तालुक्यांत अतिवृष्टी
जिल्ह्यातील दिंडोरी, मालेगाव, कळवण, बागलाण, सुरगाणा, देवळा, सिन्नर, इगतपुरी या आठ तालुक्यांत ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. तर इतर तालुक्यांतही पावसाने जोरदार हजेरी लावली.

पाऊस मि.मी. मध्ये
तालुका मि.मी.
नाशिक ६४
इगतपुरी १०६
दिंडोरी ७०
पेठ २८
त्र्यंबकेश्वर ३८
मालेगाव ७२
नांदगाव २७
चांदवड ५९
कळवण ७१
बागलाण ८७
सुरगाणा ६५.१
देवळा ८७.२
निफाड ५७.२
सिन्नर १११
येवला ५३
एकूण ९९५.५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -