घरमहाराष्ट्रनाशिकइगतपुरी वगळता सर्व जागांवर ‘राष्ट्रवादी’चा दावा

इगतपुरी वगळता सर्व जागांवर ‘राष्ट्रवादी’चा दावा

Subscribe

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पदाधिकार्‍यांची मागणी

इगतपुरी मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवार द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी आज मुंबई येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत केली. यावेळी लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणार्‍यांचाही समाचार घेण्यात येऊन कारवाईचे संकतेही देण्यात आले.

मुंबई येथे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.१४) राष्ट्रवादी काँग्रेसचा नाशिक जिल्ह्याचा तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने इगतपुरी मतदारसंघ वगळता ग्रामीण मधील सर्व मतदारसंघात उमेदवार द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे मालेगाव मध्य मतदार संघ काँग्रेसकडे असताना या मतदारसंघावरही राष्ट्रवादीने यावेळी दावा सांगितला. यावेळी शहरातील चार मतदारसंघाचाही आढावा घेण्यात आला. यात नाशिक मध्य मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, मनपा गटनेजे गजानन शेलार, विश्वास ठाकूर, माजी खासदार देविदास पिंगळे यांची नावे पुढे आली. नाशिक पश्चिम मतदारसंघातून नाना महाले आणि अपूर्व हिरे यांची नावे पुढे आली. नाशिक पूर्वमधून पक्षाकडून एकानेही इच्छा प्रदर्शित केली नसल्याचे समजते. देवळाली मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडेच असल्याने या मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी करण्यात येत आहे. यासंदर्भात ३० जूनपर्यंत उमेदवारीबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच ज्या मतदारसंघात एकापेक्षा जास्त इच्छुक असतील त्याबाबत चर्चा करण्यात येउन १० जूलैपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी यावेळी तालुका व शहराचा आढावा सादर केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, दिपिका चव्हाण आदी उपस्थित होते.

- Advertisement -

कारवाईचे संकेत

पक्षाच्या बळावर अनेकांनी जिल्हा परिषद, शैक्षणिक संस्थावर पदे मिळवली. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपच्या भोजनावळी उठवल्या, अशा पदाधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हाच धागा पकडत अनेक पदाधिकार्‍यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षातील लोकांनी कशा पद्धतीने विरोधात प्रचार केला याच्या तक्रारीच मांडल्या. याबाबत अहवाल आल्यानंतर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे संकेत पवार यांनी दिले.

मग मीच करून घेतो

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुथ समित्यांचा आढावा घेतला. काही पदाधिकार्‍यांनी समित्या कागदावर तयार असून एनसीपी कनेक्ट अ‍ॅपमध्ये त्या अपलोड करणे बाकी असल्याचे सांगितले. या उत्तराने संतापलेल्या प्रदेशाध्यक्षांनी जमत नसेल, तर मीच करून घेतो ना, असा उपरोधिक टोला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -