घरमहाराष्ट्रनाशिकव्यसनमुक्तीसाठी धावले नाशिककर

व्यसनमुक्तीसाठी धावले नाशिककर

Subscribe

पोलीस कवायत मैदान येथे महापौर रंजना भानसी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘नाईट रन’चा शुभारंभ करण्यात आला.

नाशिक: ‘तंबाखू-गुटख्याचा पडता विळखा, कॅन्सरचे ते आमंत्रण ओळखा’, ‘सिगारेटची नशा करी, अनमोल जीवनाची दुर्दशा’, ‘नाही म्हणा तंबाखूला, जवळ करा आरोग्याला’ अशा फलकाव्दारे नववर्षात तंबाखूमुक्त शहर करण्याचा संदेश देण्यासाठी शहर पोलीस, आरोग्य विभाग आणि एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरतर्फे आयोजित ‘नाईट रन’मध्ये मोठ्या संख्येने नाशिकर आबालवृद्ध सहभागी झाले. पोलीस कवायत मैदान येथे महापौर रंजना भानसी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘नाईट रन’चा शुभारंभ करण्यात आला.

पोलीस आयुक्तालय मैदानावर उपस्थित मान्यवरांनी झेंडा दाखविल्यानंतर या पाच किलोमीटर अंतराच्या नाइट रनला प्रारंभ झाला़. यावेळी व्यसनमुक्तीची शपथ डॉ़ शिल्पा बांगर यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना दिली़. रनच्या शुभारंभाप्रसंगी पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपमहापौर प्रथमेश गिते, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, डॉ.राम नगरकर आदी उपस्थित होते.

- Advertisement -

व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी काढण्यात आलेल्या नाईट रनमुळे नागरीकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. या नाईट रनसाठी वाहतूक बदल करण्यात आला होता. मात्र याविषयी फारशी जागृती न झाल्यामुळे नागरीकांनी नेहमीच्या मार्गावर आपली वाहने नेली. पोलीस कवायत मैदानापासून रात्री ९.४५ वाजता रनला प्रारंभ झाला. तत्पूर्वी रात्री ८.३० पासून पोलीस आयुक्त कार्यालय, गंगापूर रोड, कॉलेज रोड या रस्त्यांची डावी बाजू सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. मात्र याविषयी नागरिकांना फारशी माहितीच नसल्याने त्यांनी आपली वाहने या रस्त्यापर्यंत आणली. परिणामतः एका बाजूच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा झाला. पोलीस आयुकांनी अशा प्रकारचे उपक्रम दुपारच्या वेळेत राबवावेत, अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -