स्थायी सभापतीसाठी निमसे-पांडे यांच्यात सामना

नऊ सदस्य असलेल्या भाजपचे पारडे जड; गणेश गितेंचा पत्ता कट

Nashik
sabhapati standing
स्थायी सभापतीसाठी निमसे-पांडे यांच्यात सामना

शहरातील तीनही आमदारांच्या निकटवर्तीयांना बाजूला सारत भारतीय जनता पार्टीने स्थायी समिती सभापतीपदासाठी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यावर शिक्कामोर्तब केले. महत्वाचे म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत असलेल्या गणेश गिते यांचा ऐनवेळी पत्ता कट झाला. दरम्यान, गुरुवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. यात निमसे यांचा सामना शिवसेनेच्या कल्पना पांडे यांच्याशी होणार असला तरी सोळापैकी ९ सदस्य भाजपचे असल्याने निमसे यांचे सभापतीपद निश्चित मानले जात आहे.

स्थायी समिती सभापतीपदासाठी पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय गणेश गिते, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांचे निकटवर्तीय कमलेश बोडके, आमदार देवयानी फरांदे यांचे निकटवर्तीय स्वाती भामरे आणि आमदार सीमा हिरे यांचे निकटवर्तीय भाग्यश्री ढोमसे आणि पुष्पा आव्हाड यांनी ‘फिल्डींग’ लावली होती. उद्धव निमसे यांनी मात्र स्वत: विविध पदाधिकार्‍यांच्या गाठीभेटी घेत उमेदवारी पदरी पाडली. पुष्पा आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज नेला होता. मात्र, त्यांनी विहित मुदतीत अर्ज घेतला नाही. त्यामुळे निमसे यांची उमेदवारी निश्चित झाली. दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने कल्पना पांडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. मात्र, सेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे केवळ सातच सदस्य आहेत. शिवाय भाजपला सध्या ‘अच्छे दिन’ सुरू असल्याने कोणी सदस्य फितूर होण्याचीही शक्यता धुसर आहे. या पार्श्वभूमीवर निमसे यांच्या गळ्यात सभापदीपदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.