घरमहाराष्ट्रनाशिकमनपा कर्मचारी निवडणूक प्रचारात

मनपा कर्मचारी निवडणूक प्रचारात

Subscribe

आचारसंहिता कक्षाकडे तक्रार; चौकशीचे आदेश

निवडणुकीचे काम करण्यास अनुत्सुक असणारे अनेक शासकीय आस्थापना, महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचार्‍यांनी नागरी सेवा नियमांचे उल्लंघन करत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रत्यक्ष सहभागी झाले असल्याचे निदर्शनास येत आहे, अशीच एक तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षात दाखल झाली आहे. महापालिका कर्मचारी शिवसेनेच्या उमेदवाराचा उघडपणे प्रचार करत असल्याची तक्रार छायाचित्रासह दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत विभागानेही तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

निवडणूक काळात राजकीय पक्षांच्या प्रचारापासून शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी दूर राहावे, असा नियम आहे. या नियमांचे कर्मचार्‍यांकडून उल्लंघन होताना दिसून येते. पालिकेत विविध राजकीय पक्षांशी संबंधित कर्मचार्‍यांची मोठी फौज आहे. पालिकेत असताना संबंधितांनी आप्तगणांसह समर्थकांना नोकरीद्वारे रोजगार मिळवून दिलेला आहे. त्याची परतफेड करण्याची जेव्हा जेव्हा संधी येते, तेव्हा ही कर्मचारी मंडळी संबंधितांसाठी धावून जातात. याच जाणिवेतून पालिकेतील दैनंदिन कामकाजाला फाटा देत अनेक कर्मचारी उमेदवारांच्या प्रचारात मग्न आहेत. नाशिक महापालिकेप्रमाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका वा अनेक शासकीय विभागातील कर्मचारी उमेदवारांच्या प्रचारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभाग नोंदवत आहेत. उमेदवारांशी निकटचे संबंध अथवा नाते-गोते राखून असणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांची ही कार्यशैली त्या त्या कार्यालयातील मूळ कामकाजावर परिणाम करणारी ठरली आहे. लोकसभा निवडणूक प्रचारावेळी महापालिकेतील अशोक खाडे नामक कर्मचारी चक्क शिवसेना उमेदवाराचा प्रचार करत असल्याचे छायाचित्रच तक्रारदाराने आचारसंहिता कक्षाकडे सादर केले आहे. या तक्रारीची दखल घेत या कर्मचार्‍यावर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक उपजिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

- Advertisement -

नागरी सेवा नियम कागदावरच

नागरी सेवा नियमानुसार शासकीय कर्मचारी व अधिकार्‍याला प्रत्यक्ष प्रचार करणे दूर, पण कोणत्याही राजकीय पक्षांचे सदस्य होण्यासदेखील प्रतिबंध आहे. निवडणुकीत सहभाग घेणारा राजकीय पक्ष वा संघटना यांच्याशी शासकीय कर्मचार्‍याने कोणताही संबंध ठेवू नये, असे सूचित करण्यात आले आहे. शासकीय कर्मचार्‍यांना मतदान करण्याचा हक्क आहे, पण मतदारांनी कोणाला मत द्यावे हे त्यांनी सुचवू नये,असे सूचित करण्यात आले आहे. आपल्या वाहनावर कोणत्याही पक्षाचे चिन्ह प्रदर्शित करू नये, उमेदवाराचा कक्ष प्रतिनिधी वा मत मोजणी प्रतिनिधी म्हणून काम करू नये, असे या नियमात स्पष्टपणे म्हटले आहे. शासकीय नियमांची ही भरभक्कम चौकट ज्ञात असूनही अनेक कर्मचारी उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झाल्यामुळे नागरी सेवा नियम कागदावर राहिल्याचे अधोरेखित झाले आहे.

आयुक्तांच्या चेहर्‍याशी साम्य

महापालिका कर्मचार्‍याचा चेहरा हा मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या चेहर्‍याशी साम्य राखणारा असल्याने सुरुवातीला हे छायाचित्र पाहून निवडणूक विभागही बुचकळयात पडला. माहिती घेतली असता संबंधित व्यक्ती मनपा कर्मचारी असल्याचा खुलासा झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -