उदासीनतेचा ‘महापूर’; महापालिका प्रशासनाला ना पूराशी ना पूररेषेशी सोयरेसुतक

केंद्रीय जल, विद्युत संशोधन केंद्राच्या शिफारशींवर महापालिकेचे ‘पाणी’

Nahsik
NMC
नाशिक महानगरपालिका

गोदावरीला येणार्‍या पुरामुळे नदीकाठी असलेल्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या पथकाने गोदावरी आणि नासर्डी नदीची पाहणी करून पूर प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजनांची शिफारस केली होती. जलसंपदा विभागानेही या अहवालानुसार कामे करण्याच्या सूचना दिलेल्या असताना महापालिकेने होळकर पुलाखालील बंधारा काढण्याची उपाययोजना वगळता तब्बल १७ उपाययोजनांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पूररेषेची व पूरप्रभावित क्षेत्राची व्याप्ती कमी झालेली नाही. शिवाय नागरिकांनाही पुराच्या ‘महात्रासास’ सामोरे जावे लागत आहे.

काही दिवसांपूर्वी गोदावरीला आलेल्या महापुराने आजवरचे सर्वच विक्रम मोडीत काढले आहे. नारोशंकर मंदिराच्या घंटेला आजवर कधीही पुराच्या पाण्याचा स्पर्श झालेला नव्हता. यंदाच्या पुरात मात्र ही घंटा पूर्णत: बुडाली होती. यावरून पुराची वाढलेली पातळी स्पष्ट होते. या पुरामुळे तिवंधा चौकापर्यंत पाणी आले होते. परिणामी पूररेषेची व्याप्ती आता पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. वास्तविक, पूररेषेची व्याप्ती कमी करण्यासाठी तसेच पूराचा प्रभाव कमी करण्यासाठी पुण्यातील केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राने १३ डिसेंबर २०१२ ला संशोधन अहवाल सादर केला होता. हा अहवाल जलसंपदा विभागाने नाशिक महापालिकेस पुढील कार्यवाहीसाठी पाठवला. मात्र, होळकर पुलाचा अपवाद वगळता एकाही उपाययोजनेकडे महापालिकेने लक्ष दिले नाही. या उपाययोजना तातडीने झाल्या असत्या तर काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरातील नुकसानीची तीव्रता कमी होऊ शकली असती.

पूरपुर्वानुमान केंद्राकडेही दुर्लक्ष

पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस, आणि धरणातून सोडवायचा विसर्ग या बाबींचा एकत्रित विचार होऊन पुराचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी संगणीकृत पूरपुर्वानुमान केंद्राची निर्मिती व स्थापना होणे आवश्यक आहे. या संदर्भातील शिफारस संशोधन संस्थेने केल्यानंतर त्यादृष्टीने आजवर विचारही झालेला नाही. शहरासाठी आवश्यक असलेल्या मुलभूत उपाययोजनांकडे कानाडोळा करीत राज्य शासन निओ मेट्रोसारख्या अनावश्यक प्रकल्पावर कोट्यवधींचा खर्च करीत आहेत. शासनाला नाशिककरांची सुरक्षा महत्वाची की आपले चमको प्रकल्प, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

६८.५० किलोमीटर लांबीतील पूरसर्वेक्षणाकडे केले दुर्लक्ष; केवळ एकमेव उपाययोजनेची अमलबजावणी

गोदावरीच्या महापूराची चिंता १९ सप्टेंबर २००८ पासून वाढली आहे. त्यावेळी आलेल्या पूरामुळे नदीकाठच्या घरांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर २ आणि ३ ऑगस्ट २०१६ ला आलेल्या पूराने नदीकाठच्या रहिवाशांना तडाखा दिला. २००८नंतर ज्यावेळी नदीला पूर आला, त्या-त्या वेळी पूररेषेचा मुद्दा उपस्थित झाला. त्यास अनुसरुन जलसंपदा विभागाने २००९ मध्ये शहरातील नद्यांचे ६८.५० किलोमीटर लांबीतील पूरसर्वेक्षण करुन निळ्या व लाल रेषेची आखणी जोगवर व नकाशांव्दारे केली. पूररेषेच्या आखणीनंतर मोठ्या प्रमाणात नदीपात्रालगतच्या जागा या पूरक्षत्रामध्ये गेल्याने शहरामध्ये असंतोष पसरला होता. त्यामुळे तिची व्याप्ती कमी करावी आणि महत्वाचे म्हणजे पूराचा प्रभाव कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विविध पातळ्यांवरुन करण्यात आली. त्यादृष्टीने पुण्यातील केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या पथकाने नाशिक शहरातील गोदावरी व नासर्डी नदीची पाहणी करुन पूरप्रभाव कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबतचा अभ्यास केला होता. या अभ्यासाचा अहवाल संशोधन केंद्राने जलसंपदा विभागास १३ डिसेंबर २०१२ रोजी सादर केला होता. त्यानंतर वारंवार अहवालावर चर्चा करण्यात आली. परंतु प्रत्येक वेळेत ‘पालथ्या घड्यावर पाणी’चा अनुभव आला. या अहवालानुसार उपाययोजना करायच्या झाल्यास साधारणपणे शंभर कोटी रुपये खर्च होऊ शकतात. यातील बहुतांश निधी शासनाकडूनही प्राप्त होऊ शकतो. मात्र सत्ताधार्‍यांसह महापालिका प्रशासनाकडून त्यासाठी पाठपुरावाच न झाल्याने या उपाययोजना अद्याप अहवालापुरत्याच मर्यादीत राहिल्या आहेत.

या एकमेव उपाययोजनेची अमलबजावणी-

नाशिक शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी होळकर पुलाखालील बंधारा हा सन १९३९ साली बांधण्यात आला. मध्यंतरीच्या काळात महापालिकेने बंधार्‍याची उंचीही वाढवली होती. तथापि, महापालिकेने गंगापूर धरणामधून थेट पाइपलाइन केल्याने बंधार्‍याची आवश्यकता राहिलेली नाही. त्यामुळे हा बंधारा काढून तेथे बॅरेज प्रकारातील व्दारासहीत बंधारा बांधावा अशी उपाययोजना सुचविण्यात आली होती. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांत या उपाययोजनेवर सध्या काम सुरु आहे. मात्र त्याव्यतिरिक्त सर्वच उपाययोजनांना बासनात गुंडाळण्यात आल्या आहेत.

पूरप्रभावित क्षेत्र कमी करण्यासाठी सुचवलेल्या या उपाययोजनांकडे दुर्लक्ष

 • नदीपात्रात आवश्यक त्या उपाययोजनांनंतर जसे नदीपात्राची रुंदी न वाढविता नदीपात्रातील बंधारे, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे काढणे, नदीपात्रातील तळातील गाळ काढणे ही कामे केल्याने २५ वर्ष वारंवारितेच्या पुरासाठी नदीपात्रातील गोदावरी नदीची पूरपातळी ३.३ मीटर व नासर्डी नदीची पूरपातळी १.८६ मीटरने कमी होणार आहे.
 • १०० वर्षे वारंवारितेच्या पुरासाठी नदीपात्रातील गोदावरी नदीची पूरपातळी ३.८३ मीटर व नासर्डी नदीची पूरपातळी २.२१ मीटरने कमी होणार आहे.
 • ज्या भागात नदीपात्र हे खाली आहे अशा भागात नदीपात्राच्या लगत काँक्रीटमध्ये नदीस समांतर भिंती बांधून पूरप्रभावित क्षेत्र कमी करणे शक्य आहे.
 • गोदावरी नदीवरील खालच्या तलांवांना बांधलेले पूल विशेषत: आनंदवल्ली गावाजवळील जुन्या पुलाशेजारी नवीन पूल बांधण्यात आला असून जुना पूल कमी उंचीस आहे. त्यामुळे प्रवाहास अडथळा येत असल्याने सदर पूल काढणे आवश्यक आहे.
 • आसाराम बापू आश्रमाजवळील पूल हा २०,००० क्युसेक्स विसर्गानेही पाण्याखाली येतो. हा पूल काढून त्या ठिकाणी महत्तम पूरपातळीच्यावर नवीन पूल बांधणे आवश्यक आहे.
 • फॉरेस्ट नर्सरीजवळील पूल हा २५००० क्यूसेक्स विसर्गानेही पाण्याखाली येतो. सदर पूल काढून त्या ठिकाणी महत्तम पूरपातळीच्या वर नवीन पूल बांधणे आवश्यक आहे.
 • रामवाडी पूल २५००० क्युसेस विसर्गाने पाण्याखाली येतो. सदर पूल काढून त्याठिकाणी महत्तम पूरपातळीच्या वर नवीन पूल बांधणे आवश्यक आहे.
 • नासर्डी नदीवरील अंबड लिंकरोडवरील पुलाजवळील पाइपलाइनमुळे पुलाची वहन क्षमता कमी झालेली आहे. या ठिकाणची पाइपलाइन काढणे आवश्यक आहे.
 • उंटवाडी पुलाच्या स्लॅबखालील बीमची खोली जास्त असल्याने नदीपात्रामध्ये अडथळा तयार होऊन पूरपाणी आजूबाजूच्या परिसरात पाणी पसरते. सदर पूल काढून टाकून तेथे महत्तम पूर पातळीच्या वर बांधणे आवश्यक आहे.
 • तिडके कॉलनीजवळील गोंविदनगरकडे जाणारा पूल कमी उंचीवर बांधलेला असून प्रवाहास अडथळा निर्माण होतो. सदर पूल काढून टाकून तेथे महत्तम पूर पातळीच्या वर पूल बांधणे आवश्यक आहे.
 • पखालरोडवरील पुल तसेच वडाळारोडवरील पुलांची कमी स्पॅन व उंची कमी असल्याने पुलामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी पसरते. हा पूल काढून तेथे महत्तम पूर पातळीच्यावर पूल बांधणे आवश्यक आहे.
 • नाशिक-पुणे महामार्गावरील जुना पूल अरुंद असून या पुलामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी नसते. हा पूल काढून टाकून तेथे महत्तम पूरपातळीच्यावर पूल बांधणे आवश्यक आहे.
 • नासर्डी नदीवरील टाकळी गावाजवळील रामदास स्वामी मठाजवळ महापालिकेने नवीन पूल बांधलेला असून जुना पूल हा कमी क्षमतेचा आहे. त्यामुळे पूरप्रवाह आडून आजूबाजूस पाणी पसरते. हा जुना पूल तत्काळ काढणे आवश्यक आहे.
 • गोदावरी नदीवरील आनंदवल्ली बंधारा हा एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेला आहे. सद्यस्थितीत एमआयडीसीने गंगापूर धरणातून थेट पाइपलाइन केल्याने या बंधार्‍याची आवश्यकता राहिलेली नाही. त्यामुळे सदर बंधारा काढून टाकून तेथे वीज प्रकल्पातील व्दारासहित बांधारा बांधावा.
 • नासर्डी नदीवरील ब्रिटिशकालीन सिंचनासाठी बांधलेले बंधार्‍यांची शहरीकरणामुळे आवश्यकता राहिलेली नाही. हे बंधारे व नदीपात्रामधील अनावश्यक उंचवटे काढणे आवश्यक आहे.
 • गोदावरी नदीवर आनंदवल्ली ते इंद्रप्रस्थ पुलाच्या दरम्यान, उजव्या बाजूकडील नदीकाठची उंची कमी असल्याने उजव्या बाजूस सखल भागात पाणी नसते. या भागात आनंदवल्ली ते इंद्रप्रस्थ पूल या भागातील पुल हे महत्तम परपातळीस बांधून नदीपात्रास समांतर संरक्षक भिंत बांधून या पुलांना जोडणे आवश्यक आहे.