मालेगावजवळील निळगव्हाण फाट्यावर झालेल्या अपघातात एक ठार

Nashik

मालेगावपासून जवळच असलेल्या निळगव्हाण फाट्याजवळ संध्याकाळी सहाच्या सुमारास मॅक्सीमो टेम्पो व मोटारसायकल यांच्यात अपघात होऊन जायखेडा (ता. बागलाण) येथील एक जण जागीच ठार झाला.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, जायखेडा (ता. बागलाण) येथील दिंगबर नामदेव शेवाळे हा स्वतःच्या मोटारसायकल (क्रमांक MH – ४१ / R १३१९) वरून मालेगावहून जायखेड्याच्या दिशेने जात असताना नामपूरकडून मालेगावकडे येणाऱ्या मॅक्सीमो टेम्पोने (क्रमांक MH – ४१ / AU ११०५) दिंगबर शेवाळे यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. सामोरासमोर अपघात होऊन त्यात मोटारसायकलस्वार शेवाळे दूरवर फेकला गेला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मोटारसायकलचाही चुराडा झाला.

अपघात झाल्यानंतर निळगव्हाण, अजंगवडेल, व परिसरातील सामाजिक कार्येकर्ते यांनी घटनास्थळी मदत करत पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस अधिकारी रामेश्वर मोताळे, पो. ह. एस. के. निकम यांनी अपघातस्थळी धाव घेत सदर वाहन ताब्यात घेतले. याप्रकरणी वडनेर-खाकुर्डी पोलीसांनी मॅक्सीमो टेम्पोसह वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी नामदेव शेवाळे यांचे ते चिरंजीव होते तर पत्रकार प्रकाश शेवाळे(जायखेडा), समाधान शेवाळे (वडनेर) यांचे बंधू होते.