घरमहाराष्ट्रनाशिकयुरोपला १ हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात

युरोपला १ हजार कंटेनर द्राक्षांची निर्यात

Subscribe

ज्ञानेश उगले

जागतिक बाजारात यंदा द्राक्षांची चव आणि आकाराची गुणवत्ता हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे. युरोपीय बाजारपेठेत सद्यस्थितीत दक्षिण आफ्रिकेतील द्राक्ष हंगाम सुरू आहेत. दोन आठवड्यांत भारतीय हंगाम सुरू होईल. फेब्रुवारीमध्येच द्राक्ष उत्पादनात मातब्बर मानल्या जाणार्‍या चिलीच्या द्राक्षांचीही आवक होईल. गुणवत्तेच्या निकषांवरील काट्याच्या स्पर्धेत दरवर्षी एखादा तरी देश बाहेर पडतो. यंदाही ही स्पर्धा तीव्र आहे. गुणवत्तेचं आव्हान टिकविण्याचं आव्हान यंदा भारतीय द्राक्ष उत्पादकांपुढे आहे. या स्थितीत निकषांत न बसणारा माल चुकूनही जाणार नाही, याची काळजी द्राक्ष निर्यातदारांनी घ्यावी असे या क्षेत्रातील जाणकारांनी सुचवले आहे.

- Advertisement -

थंडीमुळे यंदा भारतीय द्राक्ष हंगाम दोन आठवड्यांनी पुढे सरकला आहे. भारतातून ३ फेब्रुवारीपर्यंत १ हजार कंटेनरमधून १७ हजार मेट्रीक टन द्राक्षे युरोपात पाठविण्यात आली आहेत. ही स्थिती मागील वर्षी सारखीच आहे. युरोपीय बाजारपेठेत मागील महिन्याभरापासून दक्षिण अफ्रिकेच्या द्राक्षांची आवक सुरू आहे. या द्राक्षांची आवक दर वर्षीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी जास्त असून गुणवत्तेनेही सरस आहेत. यानंतरच्या टप्प्यात भारताचा व त्यानंतर चिलीचा द्राक्ष हंगाम सुरू होईल. दक्षिण अफ्रिका, चिली हे द्राक्ष उत्पादन व निर्यातीतील सर्वात मातब्बर देश मानले जातात. जागतिक दर्जाचे वाण या देशांकडे असल्याने बाजारपेठेत या देशांचा दबदबा वाढला आहे. त्या तुलनेत भारताकडे मात्र, अजूनही पारंपारिक वाणांचीच लागवड केली जात आहे. याही स्थितीत भारतीय द्राक्ष उत्पादकांनी उत्तम व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. ‘अपेडा’नेही ‘ग्रेपनेट’ व्यवस्था तयार करून शेतकर्‍यांना साह्य केले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही मागील १० वर्षात भारतीय द्राक्षांनी युरोपच्या बाजारपेठेत आपली ओळख निर्माण केली आहे. या काळातच काही वेळा निकष सोडून साधारण दर्जाचा माल निर्यात झाल्याचा फटकाही द्राक्ष निर्यातीला बसला आहे. या स्थितीत यंदा पुन्हा दक्षिण अफ्रिका, चिली, पेरू या देशांशी भारतीय द्राक्षांची तीव्र स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत अवशेष व्यवस्थापन, चव, आकार याबाबतीत तसूभरही कमी पडणार नाही, याची काटेकोर काळजी भारतीय द्राक्ष उत्पादक व निर्यातदारांना घ्यावी लागणार असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बाजार पडल्याची अफवाच!

जागतिक बाजारातील स्पर्धा द्राक्ष शिवारातही दिसते आहे. सर्व निकषांवर चांगल्या गुणवत्तेचा माल असणार्‍या द्राक्षांना मागणी असून सरासरीपेक्षा चांगले दर मिळत आहे. या स्थितीत काही व्यक्तींकडून द्राक्षांना उठाव नसल्याचे सांगत चुकीची माहिती दिली जात आहे. आताही निर्यातदारांकडे चांगल्या ‘ऑर्डर्स’ आहेत. येत्या काळात दर्जेदार मालाला चांगली मागणी राहणार आहे. द्राक्ष उत्पादकांनी अफवांना बळी पडू नये. असे निर्यातदारांनी सांगितले.

- Advertisement -

अपरिपक्व द्राक्ष काढण्याची घाई नको

द्राक्षातील चव, शुगर ब्रीक्स चे प्रमाण हे तपासूनच द्राक्षांची काढणी करावी. द्राक्ष उत्पादक व निर्यातदार या दोन्ही घटकांनी याबाबतीत जागरूक असावे. कुठल्याही परिस्थितीत अपरिपक्व द्राक्ष काढण्याची घाई करू नये. निर्यातक्षम द्राक्षांचे दर स्थिर आहेत. दर्जाबाबत चांगले काम केले तर येत्या काळातही दर स्थिर राहतील. – जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, इंडियन ग्रेप एक्स्पोर्टर्स असोसिएशन

महाराष्ट्रातून झालेली विभागनिहाय द्राक्ष निर्यात (टनात)

नाशिक – १५,५२४
नगर – २४४
सांगली – १५८
सातारा – १४३
पुणे – ८५

भारतीय द्राक्षांचे टॉप १० आयातदार (टनात)

नेदरलॅन्ड – ७९५२
जर्मनी – २०६१
इंग्लंड – १७६९
डेन्मार्क – ५५३
फिनलॅन्ड – २०१
स्वीडन – १२७
लॅटविया – १०८
बेल्जियम – १०१
फ्रान्स – ९०
इटली – ४९

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -