घरमहाराष्ट्रनाशिककळवणच्या कांद्याची दुबई अन् युरोपवारी

कळवणच्या कांद्याची दुबई अन् युरोपवारी

Subscribe

भेंडी सुविधा केंद्रातून 350 मेट्रीक टन निर्यात

नाशिक जिल्हा कांद्याचे आगर समजला जातो. जिल्ह्यातील कांद्याला देशासह परदेशातही मोठी मागणी असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात केला जातो. कळवण तालुक्यातील भेंडी येथील पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रातून दुबई आणि युरोपमध्ये कांद्याची निर्यात करण्यात आली असून निर्यात सुविधा केंद्रामुळे येथील कांदा सातासमुद्रापार पोहोचला आहे.

जिल्ह्यात विशेषत: कसमादे पट्ट्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. कांदा साठवून त्याची परदेशात निर्यात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्या वतीने कळवण तालुक्यातील भेंडी येथे कांदा, द्राक्ष, डाळिंब निर्यात सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकर्‍यांकडून व स्थानिक बाजार समितीकडून कांद्याची खरेदी करून त्याची विशिष्ट पॉकेट करून हे कांदे परदेशात निर्यात केले जात आहेत. पणन मंडळाच्या सहकार्यातून सद्गुरु एंटरप्राईजेस व गजानन एंटरप्रायजेस या कंपन्या कांदा निर्यातीवर मोठ्या प्रमाणात भर देत असून दुबईकरीता एका कंटेनरमध्ये प्रत्येकी तीस मेट्रीक टनप्रमाणे दहा कंटेनरमधून तीनशे मेट्रीक टन कांदा मुंबई येथून जहाजाने दुबईला पाठवला आहे. आठवडाभरात कांदा दुबईत पोहोचत असल्याचे निर्यात करणार्‍या कंपनी अधिकारी म्हणाले. दुबईप्रमाणे युरोपातही साठ मेट्रीक टन कांदा निर्यात झाला आहे. निर्यातीमुळे स्थानिक शेतकर्‍यांना फायदा होत असल्याचे कंपनी व्यवस्थापन म्हणाले. राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय नाशिकचे उपसरव्यवस्थापक जयेश आहेर, पणन अधिकारी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्यात सुरू असून गजानन एंटरप्रायजेसचे संचालक प्रशांत नारकर, प्रांजली नारकर, सद्गुरू एंटरप्रायजेसचे सीईओ विश्वपाल मोरे, व्यवस्थापक सीताराम बिश्नोई, संतोष भोसले, कॅशियर संकेतीका जोरे कांदा निर्यातीसाठी प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -

6500 मेट्रीक टन कांद्याची साठवण

भेंडी येथील निर्यात सुविधा केंद्रात 6500 मेट्रीक टन कांद्याची साठवण क्षमता करण्यात आली आहे. कांद्यासोबतच आंबा, डाळिंब, द्राक्ष, टोमॅटो निर्यात केले जातात. शेतकर्‍यांना विविध सुविधाही पुरवल्या जातात. त्यामुळे येथील कांदा निर्यातीला गती प्राप्त झाली आहे.

निर्यातीला मिळतेय चालना

राज्यात कळवण, रत्नागिरी, आटपाडी (सांगली), जळगाव येथे आमची कंपनी असून कांद्यासोबतच अन्य फळे आणि पालेभाज्यांची निर्यात सुरू आहे. स्थानिकांसोबतच व्यापार्‍यांनाही या निर्यातीचा लाभ होत असून भेंडी निर्यात सुविधा केंद्र अपेडा मान्यताप्राप्त असल्याने निर्यातीला चालना मिळतेय. – प्रशांत नारकर, संचालक, गजानन एंटरप्राईजेस

- Advertisement -

तीनशे मेट्रिक टनापेक्षा अधिक निर्यात

कांद्याच्या निर्यातीसोबतच शेतकर्‍यांच्या शेतात जावून टोमॅटो खरेदी केले जातात. परदेशात कांद्याला मागणी असल्याने निर्यात मोठ्या प्रमाणात होते. दुबई, युरोपमध्ये कांद्याची निर्यात करण्यात आली असून आतापर्यंत तीनशे मेट्रीक टनापेक्षा अधिक कांदा निर्यात झाला आहे. – विश्वपाल मोरे, सीईओ, सद्गुरू एंटरप्रायजेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -