घरताज्या घडामोडी.... अन्यथा सवलती मागे घ्याव्या लागतील : जिल्हाधिकारी मांढरे

…. अन्यथा सवलती मागे घ्याव्या लागतील : जिल्हाधिकारी मांढरे

Subscribe

करोनाच्या संकटामुळे ठप्प झालेले अर्थचक्र पुन्हा गतीमान व्हावे याकरीता शासन निर्देशानूसार जिल्हयात काही सवलती देण्यात आल्या आहेत. मात्र धोका पूर्णपणे टळला अशा पध्दतीने लोक वावरत आहेत. त्यामुळे बाजारपेठांमध्ये देखील गर्दी दिसून येत आहे. यावरूनच लोक अजूनही गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येते. जर दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेतला जात असेल तर मात्र सवलती मागे घ्याव्या लागतील असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. नाशिकमध्ये परिस्थिती नियंत्रणात असली तरी, नागरीकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहनही त्यांनी केले.

नाशिक जिल्हयात करोना बाधितांची हजाराच्या जवळ जाउन पोहचली आहे. आजमितीस जिल्हयात ९८३ करोना बाधित रूग्ण असून अनेक रूग्ण हे करोनामुक्त देखील झाले आहे. गेल्या दोन महीन्यांपासून जिल्हयात लॉकडाउन सुरू असून यामुळे जिल्हयातील सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. मात्र लॉकडाउनच्या तिसर्‍या टप्प्यात उद्योग, कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. तर दुकाने सुरू करण्यासाठीही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली. नाशिक महापालिका हदद आणि मालेगाव महापालिका हदद वगळता उर्वरित संपुर्ण जिल्हा हा नॉन रेड झोनमध्ये आहे. मात्र महापालिका हदिदत रेड झोनमध्ये दैनंदिन व्यवहार सुरू राहावेत याकरीता कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात व्यवहार सुरू करण्यात आले. मात्र शहरातील बाजारपेठांमध्ये मोठया प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शारीरिक  अंतर राखणे, तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे तसेच दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला परवानगीची अट टाकण्यात आली आहे. या नियमांचे सर्रास उल्लंघन होतांना दिसून येत आहे. बाजारपेठांमध्येही सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे पाहावयास मिळते. मालेगांवनंतर नाशिक शहरात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अशा प्रकारे शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्यास हा धोका अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जर नागरिक दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेत असतील तर या सवलती मागे घ्याव्या लागतील असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. याबाबत बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, इतर जिल्हयांच्या तूलनेत नाशिक जिल्हयाची परिस्थिती नियंत्रणात आहेत. जिल्हयाचे अर्थचक्र पुन्हा सुरू व्हावे याकरीता उद्योग, कारखाने सुरू करण्यात आले. तसेच कंटेनमेंट झोन वगळता दैनंदिन व्यवहारही काही प्रमाणात सुरू करण्यात आले. मात्र जणू काही जिल्हा करोनामुक्त झाल्याच्या आर्विभावात नागरिक गर्दी करत आहेत. अजूनही लोक गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य न केल्यास सवलती पुन्हा मागे घ्याव्या लागतील असा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

- Advertisement -

अद्याप धोका टळलेला नाही त्यामुळे अजूनही आपल्याला काळजी घ्यावी लागेल. मात्र काही लोक विनाकारण घराबाहेर पडतांना दिसून येतात. अगदीच गरज असेल तर तोंडाला मास्क लावून घराबाहेर पडावे उगाचच नियमांचे उल्लंघन होत असेल, गर्दी होत असेल तर मात्र प्रशासनाला पुन्हा कडक धोरण स्विकारावे लागतील. नागरिकांनी सहकार्य न केल्यास सवलती मागे घेतल्या जातील.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -