पेठ तालुक्यात भूर्गभात हालचालींमुळे घबराट

जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी; १३ कुटुंबांचे स्थलांतर

Nashik

पेठ तालुक्यातील घोटाळे आणि करंजाळी भागात विचित्र भूर्गभ हालचाली तसेच भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी तातडीने भूगर्भ अभ्यासकांच्या पथकासह धाव घेत परिसराची पाहणी केली. या भागात भूकंपाचा संभाव्य धोका लक्षात घेता येथील नागरिकांना तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले आहे.

यापूर्वी तालुक्यातील काही गावांमध्ये खडकातून पाण्याचे बुडबुडे येत असल्याची नागरिकांची तक्रार होती. तसेच जमिनीतून आवाजही येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. दोनच दिवसांपूर्वी या भागात भूस्खलन झाल्याचे सांगण्यात येते. हा धोका ओळखून पुन्हा मोठी आपत्ती घडू नये याकरता जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने या भागाला भेट देत पाहणी केली. अजूनही भूर्गभातून पाण्याचे बुडबुडे येत असल्याच्या तसेच जमिनीतून विचित्र आवाज येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची दखल घेत भूगर्भ अभ्यासकांनी पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस आणि हायड्रो फ्रॅक्चरमुळे हवेचा दाब निर्माण होऊन हे बुडबुडे निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, तरीही प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली असून याबाबत शास्त्रज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येत आहे. तसेच येथे उंच भागातील डोंगरांवर पाणी साचल्याने हे पाणी वाहून जाण्याची सोय नसल्याने भूस्खलन होत असल्याचीही बाब समोर आली. यामुळे नागरिकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, याकरता १३ कुटुंबातील ८४ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये

मी स्वतः या भागाची पाहणी केली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मोठया प्रमाणावर झालेला पाऊस, पुनर्भरण प्रक्रिया, भूकंपाचे धक्के आणि हायड्रो फ्रॅक्चरमुळे या हालचाली असू शकतात, असा भूर्गभशास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे. मात्र, पुढे धोका निर्माण होऊ नये याकरता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून येथील १३ कुटुंबाचे स्थलांतर केले आहे. – सूरज मांढरे, जिल्हाधिकारी,