जिल्हा परिषदेत बदल्यांना परवानगी

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल-मे महिन्यांतील जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या न करण्याचे आदेश असताना जिल्हा परिषदेनी बदल्यांचे आदेश दिले आहेत. कार्यरत असलेल्या पदांच्या 15 टक्के कर्मचार्‍यांची 31 जुलैपर्यंत बदल्या होणार आहेत.

कोरोना महामारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध विभागातंर्गत उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे गरजेचे असल्याने 2020-21 या वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची बदली करण्यात येऊ नये असे आदेशात म्हटले होते. मात्र, दिव्यांग, विशेष बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी शासनाकडे केली होती. मात्र, सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी (दि.7) दिलेले आदेश रात्री उशीरा जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. दरवर्षी मे महिन्यात जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 आणि 4 मधील कर्मचार्‍यांची बदल्यांची प्रक्रिया पार पडत असते. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने यंदाही बदलीपात्र कर्मचार्‍यांकडून आवश्यक ती माहिती जमा करून बदल्यांची तयारी केली होती. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य शासनाने 4 मे रोजी आदेश काढून कर्मचारी बदली प्रक्रीया राबवू नये, असे आदेश काढले होते. आदेश प्राप्त झाल्यानंतर बदल्यापात्र कर्मचार्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.