सव्वा कोटींची खंडणी घेणारा तोतया पत्रकार अटकेत

यूट्युब न्यूज चॅनेलचा पत्रकार असल्याचे भासवत एकाने औरंगाबाद येथील तक्रारदाराला दिली होती धमकी

NASHIK
crime
प्रातिनिधीक फोटो

यूट्युब न्यूज चॅनेलचा पत्रकार असल्याचे भासवत एकाने औरंगाबाद येथील एकाला १ कोटी २५ लाख रुपयांची खंडणीसाठी धमकी दिली. हे पैसे देण्यासाठी सोमवारी (दि.७) नाशिकमध्ये बोलावले. धमकी देणार्‍याकडून पैसे स्वीकारताना तोतया पत्रकाराला म्हसरुळ पोलिसांनी अटक केली. विनायक कांगणे (रा. कल्याण, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पत्रकाराचे नाव आहे.

म्हसरुळ पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.७) दुपारी तक्रारदाराने पोलिसांत तक्रार केली. काही दिवसांपासून तोतया पत्रकार विनायक कांगणे हे दोन कोटी रुपयांची खंडणीची मागणी करत धमकी देत आहेत. तडजोडीअंती १ कोटी २५ लाख रुपये देण्याचे ठरले. कांगणे यांनी तक्रारदाराला सोमवारी हॉटेल करी लिव्ह, दिंडोरी रोड येथे पैसे घेवून बोलविले. तक्रारदाराने १ लाखांच्या खर्‍या नोटा आणि उर्वरित १ कोटी २४ लाख रुपयांच्या खोट्या नोटा सोबत घेतल्या. म्हसरुळ येथून जात असताना थेटे त्यांच्या मित्राच्या मोबाईलवर फोन करुन कांगणे याने रिध्दी-सिद्धी अपार्टमेंट, कलानगर, जेलरोड येथे येण्यास सांगितले. तक्रारदार बदललेल्या या पत्यावर पोहोचले. त्याला कांगणे पैसे देत असतानाच मुद्देमालासह म्हसरुळ पोलिसांनी कांगणे याला अटक केली. पोलिसांना कांगणे याच्याकडे पत्रकार असल्याचा पुरावा किंवा कागदपत्रेही सापडली नाहीत.