मराठा आंदोलनकर्त्यांना पोलिसांची नोटीस

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मराठा आंदोलनकर्त्यांना पोलीस प्रशासनाने नोटीस बजावून खबरदारीचा उपाय सुचवला आहे

maratha morcha

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने सरकार विरुध्द आता आंदोलनाचे हत्यार उपसले जाण्याची शक्यता आहे. यासाठी मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जिल्हास्तरावर बैठकाही होत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मराठा आंदोलनकर्त्यांना नोटीस पाठवली आहे.

मराठा समाजाच्या वतीने सर्वपक्षीय आणि संघटनांमधील मराठा समाज पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची जिल्हास्तरावर बैठक पार पडली. परंतु, सद्यस्थितीत कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या अनुषंगाने नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा विषयक कार्यक्रमांना राज्य सरकारने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनकर्त्यांना पोलीस प्रशासनाने नोटीस बजावून खबरदारीचा उपाय सुचवला आहे.

राज्यभरात मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्याने मराठा समाजाकडून आंदोलन होत आहेत. त्यामुळे शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी एकाच ठिकाणी पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाविरुद्ध आंदोलनात्मक पवित्रा न घेता आपली मागणी न्यायालयीन लढ्याने लढावी, असे पोलीस प्रशानाने मराठा आंदोलनकर्त्यांना नोटीसद्वारे कळवले आहे.