अद्ययावत मतदार याद्यांसाठी राजकीय पक्षांचा सहभाग महत्त्वाचा

जिल्हा प्रशासन व राजकीय पदाधिकार्‍यांच्या बैठकीत विभागीय आयुक्त राजाराम माने यांचे आवाहन

Nashik
Total voter turnout for 2nd phase of LokSabha Elections 2019 is 61.12%.
लोकसभा निवडणुक २०१९

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी राजकीय पक्षांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी केले.

जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात राजकीय पक्षांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, शिवसेना कार्यालय प्रमुख अ‍ॅड. राहुल वाणी, भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नंदकुमार देसाई, मनसेचे प्रतिनिधी मनोज कोकरे आदी उपस्थित होते. माने पुढे म्हणाले की, मतदार यादी अद्ययावत करताना महत्वाच्या व्यक्तींची नावे तपासावीत. जिल्ह्यातील मृत मतदारांची नावे वगळून निर्दोष व परिपूर्ण मतदार याद्या तयार कराव्यात. त्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे.

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जिल्ह्यात सध्या मतदार यादीची दुसरी संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम सुरू आहे. त्या अंतर्गत शनिवार व रविवारी जिल्ह्यातील ४ हजार ७२० केंद्रांवर विशेष मोहीम ठेवण्यात आली होती. विभागीय आयुक्त माने यांनी नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही मतदान केंद्रांना भेटी देऊन मोहीमेची पाहणी केली. यावेळी उपायुक्त रघुनाथ गावडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, तहसीलदार अनिल दौंड व निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती सविता पठारे आदी उपस्थित होते.

नवमतदारांना जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

मतदार याद्या पुनरिक्षण मोहीमेंतर्गत नवमतदारांनादेखील आपली नावे नोंदविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिकाधिक तरुणांनी पुढे येऊन मतदार यादीत आपली नावे नोंदवावीत, असे आवाहनही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here