शेजारणीने मारल्या पोटात लाथा, बाळाचा पोटातच मृत्यू

लहान मुलांचे भांडण झाल्याच्या कारणावरुन शेजारी राहणाऱ्या महिलेने एका गर्भवती महिलेच्या पोटात लाथा मारल्याने पोटातील बाळ मृत झाल्याची धक्कादायक घटना लहवित येथे रविवारी, २१ जुलैला उघडकीस आली.

Nashik
attack
लहान मुलांचे भांडण झाल्याच्या कारणावरुन शेजारी राहणाऱ्या महिलेने एका गर्भवती महिलेच्या पोटात लाथा मारल्याने पोटातील बाळ मृत झाल्याची धक्कादायक घटना लहवित येथे रविवारी, २१ जुलैला उघडकीस आली. याप्रकरणी हल्लेखोर महिलेविरुद्ध देवळाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड गावठाण (लहवित) येथे राहणाऱ्या मथुरा विनोद गायकवाड या महिलेच्या मुलाने १६ जुलैला दुपारी तिचा भाचा सुरेश बंडु पवार याच्या मुलाची बॅट घेतली होती. त्यावरुन झालेल्या भांडणात मथुरा हिने सुरेशची पत्नी सोनाली हिच्याशी वाद घातला. सोनाली चार महिन्याची गरोदर असतानाही मथुराने सोनालीच्या पोटात लाथा व बुक्यांनी मारहाण केली. यावेळी सोनालीला त्रास झाल्याने उपचारासाठी बिटको हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी सोनोग्राफी केली असता पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. त्यानंतर मृत गर्भ काढण्यात आला. याबाबत सोनालीचा पती सुरेश याने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.