घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्ररात्रीच्या अंधारात माणुसकीचा उष:काल; गृहमंत्र्यांकडून गंगापूर पोलिसांचे कौतुक

रात्रीच्या अंधारात माणुसकीचा उष:काल; गृहमंत्र्यांकडून गंगापूर पोलिसांचे कौतुक

Subscribe

पोलिसांनी शासकीय वाहतून गर्भवतीस केले रुग्णालयात दाखल

नाशिक : गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील भारती उत्तम जाधव (वय २३) या गर्भवती महिलेस मध्यरात्री ३ वाजेदरम्यान प्रसूती कळा सुरु झाल्या. तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी सासू व सासरे रुग्णवाहिका व खासगी वाहन शोधत होते. मात्र, वाहन उपलब्ध होत नसल्याची माहिती गस्तीवरील गंगापूर पोलिसांना मिळाली. गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी गर्भवती महिलेसह तिच्या नातेवाईकांना शासकीय वाहनाने रुग्णालयात पोहोचवले. काही क्षणातच महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्यासह बाळाची प्रकृती चांगली आहे. कठीणप्रसंगी मदत केल्याने नातेवाईकांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले. विशेष म्हणजे, गंगापूर पोलीस कर्मचार्‍यांच्या या कामगिरीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे.

गंगापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पवार व पोलीस हवालदार उगले, गिरीश महाले, सोळसे हे रात्र गस्त घालत दुचाकीने पहाटे ३ वाजेच्या सुमारास गंगापूर गाव परिसरात पोहचले. या ठिकाणी भारती जाधव तिच्या सासू व सासर्‍यांसह पायी चालत जात होती. वाटेतच पोटात दुखू लागल्यामुळे त्यांनी रस्त्यावर मदतीसाठी आक्रोश सुरु केला. भल्या पहाटे तीन व्यक्ती पाहुण पोलिसांनी चौकशीसाठी म्हणून वाहन त्यांच्यापाशी उभे केले. तेंव्हा भारती जाधव हिस प्रसूती कळा सुरू असल्याचे व कोणतेही वाहन मिळत नसल्याचे पोलिसांना समजले. पवार यांनी क्षणाचाही विलंब न घालवता तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या परवानगीने गुन्हे शोथ पथकाची व्हॅन पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार पथकाचे पोलीस नाईक गिरीष महाले, राहुल सोळसे यांनी तात्काळ गंगापूर गाठून गर्भवती महिलेस तिच्या सासू व सासर्‍यांना गिरणारे ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहचल्यानंतर पहाटे अवघ्या २० मिनिटात महिलेची प्रसूती झाली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला.

- Advertisement -

कर्तव्य दक्षतेचे फळ

पोलिसांकडे केवळ भितीयुक्त नजरेने पाहिले जाते. परंतु नाशिक पोलिसांनी भल्या पहाटे पायी चालत रुग्णालयाच्या दिशेने निघालेल्या गर्भवती महिलेस रुग्णालयात पोहोचवत माणुसकीचे दर्शन घडवल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दिपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल यांनी सर्व कर्मचार्‍यांचे कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -