अंमलीपदार्थप्रकरणी निर्माता फिरोज नाडियादवालाच्या पत्नीला अटक

फिरोज नाडियालवाला यांचीही एनसीबीकडून लवकरच चौकशी होणार

अंमली पदार्थ घरात बाळगल्याप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक फिरोज नाडियालवाला यांची पत्नी शबाना सईद फिरोज नाडियालवाल हिला रविवारी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी अटक केली. एका ड्रग्स विक्रेत्याकडून ड्रग्ज खरेदी केल्याचा तिच्यावर आरोप असून याच गुन्ह्यांत लवकरच फिरोज नाडियालवाला यांचीही एनसीबीकडून चौकशी होणार आहे. दरम्यान, अन्य एका कारवाईत एनसीबीच्या अधिकार्‍यांनी चार ड्रग्स विक्रेत्यांना ड्रग्सच्या साठ्यासह अटक केली असून या चौघांनाही सोमवारी लोकल कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

ड्रग्सच्या गुन्ह्यांत शबाना सईदच्या अटकेने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी वाहिद अब्दुल कादिर शेख ऊर्फ सुल्तान नावाच्या एका आरोपीला एनसीबीने ड्रग्जसहीत अटक केली होती, त्याच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात या अधिकार्‍यांना यश आले होते, त्यात त्याने फिरोज नाडियालवालाच्या पत्नीला तो ड्रग्स सप्लाय करीत असल्याचे सांगितले होते. या माहितीनंतर एनसीबीच्या अधिकार्‍यांनी रविवारी फिरोज नाडियालवालच्या जुहू येथील जेव्हीपीडी, गुलमोहर क्रॉस रोड क्रमांक पाच, बरकत अपार्टमेच्या फ्लॅटमध्ये छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी दहा ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा जप्त केला आहे. हा गांजा शबाना सईदला वाहिद शेख याने दिला होता. याच गुन्ह्यांत नंतर शबानाची एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती.

शबानाला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते, चौकशीत तिने वाहिदकडून ड्रग्स घेतल्याची कबुली दिली. त्यांनतर तिला याच गुन्ह्यांत या अधिकार्‍यांनी अटक केली. याच दरम्यान एनसीबीच्या अधिकार्‍यांनी दोन दिवसांत मुुंबईसह खारघर परिसरात छापा टाकून चार आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी 717 ग्रॅम गांजा, 74 ग्रॅम चरस, 95 ग्रॅम एमडी आदी ड्रग्ज जप्त केले. या ड्रग्जची किंमत साडेतीन लाख रुपये आहे. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी नंतर या चौघांनपाही पोलिसांनी अटक केली.

शबानासह या चौघांनाही सोमवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. या पाचजणांची एनसीबी कोठडीची मागणी करुन त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती काढण्यावर आता एनसीबीने भर दिला आहे. दरम्यान याच गुन्ह्यांत लवकरच फिरोज नाडियालवाला यांची चौकशी होणार आहे. त्यासाठी त्यांना समन्स बजाविले जाणार असल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.