सप्तशृंगी गडाला पर्यायी मार्ग प्रस्तावित

सुरत-शिर्डी महामार्ग भातोडे घाटरस्ताने जोडला जाणार

Nashik
Saptshrungi Gadh

नाशिक-कळवण मार्गावरून जाताना नांदूरी गावातून सप्तश्रृंगगडावर जाण्यासाठी असलेला 9 किलोमीटर अंतराचा घाटमार्ग भाविक, प्रवाशांच्या वाहनांसाठी येणे-आणि जाण्यासाठी वापरला जातो. याच मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून भातुर्डी-सप्तश्रृंगीगड हा मार्ग बनविला जावा, असा प्रस्ताव सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टने सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेला आहे. हा पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यास सध्याच्या घाटातील वाहतूक विभाजित होऊन वर्दळ कमी होण्यास मदत होणार आहे.

सुरत-शिर्डी या महामार्गाचे काम सूरू असल्याने याच मार्गावर भातोडी हे गाव कळवण तालुक्यात आहे. गडाच्या मागच्या बाजुला असलेल्या गुजरातच्या भाविकांना सध्या गडावर येण्यासाठी नांदूरीमार्गे घाटरस्त्याने गडावर यावे लागते. सध्याच्या घाटमार्गावर वाहनांची वर्दळ वाढलेली आहे. एकमेव वाहनमार्ग असल्याने गडावर चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव, कोजागिरी पौर्णिमा, दर मंगळवार, शुक्रवार आणि इतर सुट्यांच्या दिवसात भाविकांची मोठी गर्दी होते. यात्रा काळात गडावर फक्त एसटी महामंडळाच्या गाड्यांना वाहतुकीसाठी मुभा असते.

खासगी वाहनांची पार्कींग ही नांदूरीला गडाच्या पायथ्याशी केलेली असते. त्याचबरोबर पायरी मार्गाने नांदूरीतून भाविक येत असतात. तसेच वणी येथून रडतोंडी मार्गेही देवीभक्त गडावर येतात. हे दोन्ही मार्ग भाविकांकडून यात्राकाळात अधिक वापरले जातात. पण घाट मार्ग हा कायम वाहनांच्या वर्दळीने गजबजलेला असतो. जाण्यास आणि येण्यास हाच मार्ग असल्याने वाहनांसाठी दूसरा पर्यायी मार्ग सध्या तरी नाही. नागमोडी वळणावर वाहनचालकांकडून जर वेग नियंंत्रणात राहिला नाही तर प्रवाशांच्या काळजाचा ठोक चुकतो. 2007 मध्ये घाटात युटर्नवर खासगी बस थेट खाली गेली होती. यात चालक वगळता सर्व प्रवासी भाविक दगावले होते. तेव्हापासून घाटाच्या

पर्यायी कामाची चर्चा होती.

सप्तश्रृंगीगडाच्या शीतकडा परिसरातून दिसणारा आणि मार्केड पिंपरी डोंगराच्या मध्ये असलेला सध्या जो मार्ग तयार करण्यात आलेला आहे. हा मार्ग वर्णी-नांदूरीमार्गे कळवण रस्ता आणि वणी- कळवण या लिंकरोडला मधला मार्ग म्हणून जोडणारा दूवा आहे. हाच मार्ग भातोडे गावातून वणी -कळवण लिंक मार्गाला जोडता तर उतरेला मार्केड पिंपरीरोडला जोडला जातो. दक्षिणेला हा मार्ग भातोडे गावातून पुढे कसबे वणी वरून सुरत-शिर्डी महामार्गाला जोडला जातो. त्यामुळे हा मार्ग झाला तर वाहनांची सुरक्षितता, जोडल्या जाणार्‍या गावांची प्रगती आणि वाहनांच्या इंधन बचतीत मोठा फरक होऊ शकतो, असे महत्व पटवून देत सप्तश्रृंगी निवासनी देवी ट्रस्टच्या वतीने केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिलेले आहे. हा मार्ग झाला तर वाहनांसाठी पर्यायी मार्ग सुकर होणार आहे. तसेच पायी चालणार्‍या भाविकांनाही सुविधा मिळणार आहे.

केंद्रिय मंत्र्यांना साकडे

गडावर वाहनांने येणार्‍या भाविकांची संख्या अधिक आहे. वाहनांसाठी सध्याचा घाटमार्ग वगळला तर दूसरा मार्गच अस्तित्वात नाही. सुरक्षा, वेळ आणि इंधनबचत करण्यासाठी भातोडे गाव मार्गे नवीन घाट बनविण्यात यावा. सध्या गडाच्या शितकडा परिसरातून दिसणारा मार्केंड पिंपरी हा मार्ग भातोडेला जोडणारा आहे. हाच मार्ग गडावर रिंगरोडला पुढे जोडता येईल.याच मार्गाने पुढे सुरत-शिर्डी या महामार्गाला गड जोडला जाईल, असे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना ट्रस्टने पत्र देवून मार्गाचे महत्व पटवून देत, घाटासाठी साकडे घालण्यात आलेले आहे. हा मार्ग झाला तर गडावर येणार्‍या भाविकांच्या मार्ग सुविधेत भर पडणार आहे. – सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक, सप्तश्रृंगी निवासनी देवी ट्रस्ट