घरमहाराष्ट्रनाशिकपब्जी, फोर्ट नाईट गेम्सचे राज्यभर थैमान

पब्जी, फोर्ट नाईट गेम्सचे राज्यभर थैमान

Subscribe

ब्लू व्हेल आणि पॉकेमॉन हे मोबाइल गेम लहान मुले आणि तरुणांसाठी जीवघेणे ठरल्यानंतर त्यावर शासनाने बंदी आणली खरी; परंतु त्याची जागा आता पब्जी आणि फोर्ट नाईट या दोन ऑनलाईन गेम्सने घेतल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

ब्लू व्हेल आणि पॉकेमॉन हे मोबाइल गेम लहान मुले आणि तरुणांसाठी जीवघेणे ठरल्यानंतर त्यावर शासनाने बंदी आणली खरी; परंतु त्याची जागा आता पब्जी आणि फोर्ट नाईट या दोन ऑनलाईन गेम्सने घेतल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सर्वत्र या गेमनेच थैमान घातले असून त्यामुळे मुलांच्या वर्तनावर दूरगामी परिणाम होतो आहे. या गेम्समुळे डिप्रेशनमध्ये गेलेली मुले आणि तरुणांची संख्या वाढली असल्याचे शहरातील मानसरोग व मनोविकास तज्ज्ञांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले. त्यातील अनेक मुलांवर मानसशास्त्रीय उपचारही सुरू आहेत. या गेम्समुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान तर होत आहेच. शिवाय त्यांच्यात गुन्हेगारी वर्तन वाढत असल्याचेही दिसून येत आहे.

एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील एका पालकाने पब्जी गेममुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार केली. त्यामुळे हा गेम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी ब्लू व्हेल गेममुळे अनेक मुलांनी आपले आयुष्य संपवल्याची विदारक बाब पुढे आली होती. त्याचप्रमाणे पोकेमॉन गेमच्या नादात वाहनांचा विचार न करता रस्त्यावर उतरलेल्या बालकांसह युवकांच्या अपघाताच्या घटनाही गेल्या वर्षी घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्ले स्टोअरवरून हे खेळ ‘हद्दपार’ करण्यात आले. त्याचप्रमाणे भारत सरकारनेही या खेळांवर बंदी घातली. त्यामुळे या खेळांच्या लिंक पाठविण्यासही मज्जाव करण्यात आला. हे गेम्स बंद झाल्यानंतर बालक आणि युवकांची जीवनशैली सुखद होण्याच्या मार्गावर असतानाच आता नव्या गेमने पालकांना पुन्हा एकदा धडकी भरवली आहे. अँड्रॉईड मोबाईलवर अगदी सहजपणे डाऊनलोड होणार्‍या या गेममुळे मुलांमध्ये व्यसनाधिनतेसारखी लक्षणे दिसतात. मुलांना पालकांनी काही कामे सांगितली, तरीही ते चिडचिड करुन त्यास नकार देतात. शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत. गेमच्या विरोधात बोलणार्‍या शिक्षकांशी ते उद्धट बोलतात. त्यामुळे पालकांबरोबर शिक्षकांसाठीही आता हे गेम डोकेदुखी ठरत आहेत.

- Advertisement -

गेममुळे सिगारेटचे व्यसन

शहरातील एका मानसरोगतज्ज्ञाकडे आलेल्या केसनुसार, गेमच्या नादी लागलेल्या नववीच्या मुलाला सिगारेटचे व्यसन जडले. गेम खेळताना प्रचंड मानसिक तणाव येत असल्यामुळे तो सिगारेटच्या माध्यमातून तणाव घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानसरोगतज्ज्ञांनी सांगितले. सिगारेटमुळे तणाव दूर होतो, असा गैरसमज चित्रपट, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका आणि तत्सम बाबींमुळे पसरत असल्याने मुले व्यसनाधीन होत असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे.

- Advertisement -

काय आहे पब्जी गेम

प्लेअर्स अनॉन बॅटल ग्राऊंड असा फुलफॉर्म असलेला पब्जी गेम अँड्रॉइड फोनवर विनामूल्य खेळता येतो. अर्थात तो खेळण्यासाठी इंटरनेटवर पैसा हा खर्च होतच असतो. एकावेळी जगभरातील शंभर लोक एकत्रितरित्या हा गेम खेळू शकतात. यातील प्रत्येकावर ९९ खेळाडूंना मारण्याचे आव्हान असते. या ९९ खेळाडूंना मारण्याच्या नादात वेळेचा मोठा अपव्यय होत असतो. गेम खेळताना मुले गेममध्ये इतका रस घेतात की, आजूबाजूला काय घडतेय याचेही त्याला भान राहत नाही. इतकेच नव्हे तर मुलगा जेवणा-खाण्याच्या वेळादेखील पाळत नाही. फोर्ट नाईट गेमदेखील याच धाटणीचा असून, मुले त्याकडेदेखील मोठ्या प्रमाणात वळत असल्याचे दिसते.

काय होते या गेममुुळे

  • मुले अभ्यास करण्यास आणि परीक्षा देण्यास टाळाटाळ करतात
  • मुलांच्या वर्तनात चिडचिडेपणा येतो
  • जे मुले शाळा-महाविद्यालयात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत होते, त्यांची गुणवत्ता काही महिन्यातच कमालीची घसरली
  • मुलांमध्ये हिंसक वृत्ती वाढीस लागते
  • मुलांना जेवणाखाण्याचे भानही राहत नाही
  • मुले व्यसनाधीन होतात

तज्ज्ञ म्हणतात…

पब्जी आणि फोर्ट नाईट गेममुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. माझ्याकडे महिनाभरात अशा प्रकारच्या सुमारे दहा केसेस आल्या आहेत. मुलांना सहजासहजी मोबाईल आणि इंटरनेट उपलब्ध करुन दिल्यामुळे ही समस्या अधिक वाढली आहे. त्यातून मुक्तता मिळविण्यासाठी मुलांकडून थेट मोबाइल काढून न घेता गेम खेळण्याचा कालावधी हळूहळू कमी कसा होईल, यावर भर द्यावा. सुरुवातीला दोन दिवसांतून एकदा त्यानंतर आठवड्यातून एकदाच गेम खेळण्यास परवानगी द्यावी. याच दरम्यान, मुलांचे मन मैदानी खेळाकडे वळवावे, जेणेकरुन त्यांची उर्जा या खेळांकडे खर्ची होईल. – डॉ. नीलम मुळे, मानसरोग तज्ज्ञ

ऑनलाईन गेम सुरु असताना वारंवार फ्लॅश जाहिराती येत असतात. या जाहीराती पॉर्न साईटकडे तरुणांना वळविणार्‍या असतात. त्यामुळे गेम खेळताना पॉर्न साईटकडे वळणार्‍या तरुणांची संख्याही वाढलेली दिसते. – तन्मय दीक्षित, सायबर तज्ज्ञ

लेक्चर सुरू असताना मुले बेंचखाली मोबाईल ठेवून पब्जी गेम खेळत असल्याचे निदर्शनास आले. वास्तविक महाविद्यालयात मोबाईलला बंदी आहे. तरीही मुले लपवून मोबाईल आणतात आणि गेम खेळत बसतात. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांना आम्ही कडक शब्दांत समज दिली आहे. – प्रा. संजय भंडारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -