‘सार्वजनिक बांधकाम’.. पण अस्वच्छ

शौचालये तुंबली, भिंती गुटख्याच्या पिचकर्‍यांनी रंगल्यामुळे या कार्यालयाचे हरपले सौंदर्य

Nashik
aswachhata PWD
'सार्वजनिक बांधकाम'.. पण अस्वच्छ

रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, कार्यालयीन आवारे आणि गल्लीबोळातील कचर्‍यांच्या जागा स्वच्छ ठेवण्याचा हेतू असलेल्या केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा शासनाच्याच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाला विसर पडला की काय, असा प्रश्न पडतो. या विभागाच्या प्रशासकीय इमारतील तुंबलेले शौचालय, गुटख्याच्या पिचकर्‍यांनी रंगलेल्या भिंती आणि कानाकोपर्‍यात पडलेल्या कचर्‍यामुळे विभागाला स्वच्छता अभियानाचा विसर पडल्याचे विदारक चित्र आहे.

राज्य शासनाचे महत्वाचे खाते असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाशिक विभागाचे तीन प्रशासकीय कार्यालये शहरातील उंटवाडी परिसरात आहेत. इमारतीचा दर्शनी भाग उद्यान, शोभिवंत वृक्षांनी चकचकीत आहे. मात्र वरून शोरूम आणि आतून गोडावून याचा प्रत्यय याचा अशी स्थिती येथील पूर्व आणि उत्तर विभागाच्या प्रशासकीय कार्यालयातील अंतर्गत अस्वच्छता पाहून येते. दोन्ही इमारतीच्या विविध मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहातील दुर्गंधी परिसरात पसरलेली असते. महिला आणि पुरूषांच्या प्रशासनगृहात शौचकुपे कचर्‍यामुळे तुंबलेली आहे. तसेच तेथील नळ बंद आहे. दरवाज्यांची मोडतोड झाल्याने किळसवाणी अस्वच्छता नजरेस पडते. मुतारींमध्ये गुटख्याची पाकिटे पडलेली दिसतात.

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान, गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ खावून थुंकण्यास प्रतिबंध असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंती पिचकर्‍यांनी रंगलेल्या आहेत. विभागाच्या उतर विभाग इमारतीच्या जीन्याखाली प्रचंड कचरा साचलेला आहे. मजल्याच्या परिसरात धुळीचे साम्राज्य आहे. तर अडगळीत पडलेल्या वस्तुची नीट व्यवस्था नसल्याने सुंदर दिसणार्‍या इमारतीचे अंतर्गत स्वरूप अभ्यागताना नजरेस भरत आहे.