सायखेड्यातील बनावट पीक संजीवक निर्मिती उद्योगावर छापा

सुशांत केमिकल्समध्ये गुणवत्ता नियंत्रण विभागाची मोठी कारवाई, शेतकऱ्यांची फसवणूक करणारा संचालक फरार

NASHIK
Duplicate CPPO
बनावट संजीवकांच्या साठ्यासमवेत गुणवत्ता नियंत्रण विभागाचे अधिकारी

निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात गुणवत्ता नियंत्रण विभागाने सायखेडा येथील सुशांत केमिकल्सवर छापा टाकत बनावट संजीवकांच्या निर्मिती उद्योगावर छापा टाकला. शासनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करत कंपनीसह गुदामात संजीवकांची निर्मिती आणि पॅकिंग करुन तो साठा विक्रीसाठी ठेवला जात होता. या माहितीवरुन गुणवत्ता नियंत्रण विभागाने ही कारवाई केली. कंपनीमालक रवींद्र शिवनाथ बाहेती (रा. जुनी पंडीत कॉलनी, नाशिक) याची दोन तास तपासणी केल्यानंतर त्याच्याकडे उत्पादनासाठीचा कोणताही परवाना आढळला नाही. बनावट संजीवक विक्रीतून प्रचंड पैसा कमावणाऱ्या कंपनीकडून शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होताच बाहेती फरार झाला.

द्राक्ष बागांसह टोमॅटो, डाळिंब इ. पीकांच्या वाढीसाठी संजीवके वापरली जातात. त्यामुळे त्याची जिल्हाभरात मोठी मागणी असते. ही बाब हेरून बनावट संजीवकांचा उद्योग सुरू असल्याची गुप्त माहिती जिल्हा गुणवत्ता निरीक्षक किरण विरकर यांना समजली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.