धार्मिक स्थळे आजपासून खुली, स्वच्छतेसह सुविधांसाठी जय्यत तयारी

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह प्रबोधनावर जोर

Kalaram Mandir Nashik

कोरोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेली प्रार्थनास्थळे पाडव्याच्या मुहूर्तावर अर्थात सोमवारी (दि.१6) सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी सर्वच प्रमुख मंदिरांमध्ये स्वच्छतेसह सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे नियोजनाची तयारीला वेग आला होता.

भाविकांच्या गर्दीचे नियंत्रण, सोशल डिस्टन्सिंगचे पालन यासाठी मंदिर व्यवस्थापनांकडून विशेष लक्ष दिले जाते आहे. नाशिक शहरातील काळाराम मंदिरासह श्री कपालेश्वर महादेव मंदिर, नवश्या गणपती याशिवाय त्र्यंबकेश्वर मंदिर श्री सप्तश्रुंगी मंदिरांमध्येही मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने उपाययोजना सुरू आहेत. त्यात थर्मल स्कॅनर, सॅनिटायजर, कोरोना संसर्गाबाबत प्रबोधनपर फलक लावण्याचा समावेश आहे. धार्मिक स्थळांवर आधारित व्यावसायिकांमध्येही या निर्णयामुळे उत्साह संचारला आहे.ञ्यंबकेश्वराचे मंदिर सोमवार पासुन चालु करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट सज्ज तर व्यावसायिकांमध्ये आनंद संचारला आहे.

त्र्यंबकेश्वर दर्शन मार्गावर सुविधा

त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराजाचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्याचे नियोजन विश्वस्तांनी केले आहे. दर्शनासाठी येताना मास्कचा वापर बंधनकारक राहणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे, यासाठी दर्शन मार्गावर आखणी करण्यात आली आहे. मंदिर मार्गावर विविध ठिकाणी थर्मल गन, ऑक्सिमिटर, सॅनिटायझर स्टँड व हात धुण्याच्या सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत.

सप्तश्रुंगी गडावर गर्दीचे व्यवस्थापन

वणी येथील श्री सप्तश्रुंगी देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करतानाच संभाव्य गर्दी लक्षात घेता गर्दी व्यवस्थापनाकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यासाठी बॅरेकेडिंगचेही नियोजन केले आहे. सोशल डिस्टन्सिंगसाठी दर्शन मार्गावर आखणी करण्यात आली आहे.

व्यावसायिकामध्ये आनंद

धार्मिक स्थळे आठ महिन्यांपासून बंद होते. त्यामुळे पूजासाहित्यापासून ते फुल आणि प्रसाद अशा विविध वस्तू विक्री करणार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. मात्र, मंदिरे खुले करण्याच्या निर्णयामुळे या व्यावसायिकांमध्ये आनंद पसरला आहे. भाविकांची वाहतूक करणार्‍या वाहनचालकांकडूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.