पोलिसाने घेतली झडती आणि सापडले भलतेच

पोलीस गस्त घालत असताना भद्रकाली परिसरात रविवारी (दि.११) रात्री १०.३० वाजता एकजण अंधारात संशयास्पद थांबलेला दिसताच पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे लोखंडी रिव्हॉल्वर आढळून आले. पोलिसांनी रिव्हॉल्वरसह त्याला अटक केली. चेतन उर्फ विकी भगवान शेणगे (वय २७, रा. दिपज्योती रो-हाउस, हिरावाडी, पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

भद्रकाली पोलीस ठाण्याचे बीटमार्शल दीपक सखाराम पाटील व होमगार्ड विलास आहेर रविवारी (दि.११) रात्री १०.३० वाजता ठाकरे गल्ली, पिंपळ चौक, भद्रकाली येथून मेनरोड, भद्रकालीकडे दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी ठाकरे गल्लीतील आनंद फूट वेअर दुकानाबाहेरील अंधारात एकजण संशयास्पद थांबलेला दिसला. त्याने खोटे नाव सांगून झडती घेण्यास टाळाटाळ करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. संशय आल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे लोखंडी रिव्हॉल्वर आढळून आले. घटनास्थळी पोलीस अधिकारी गिरी आले. त्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चेतन शेनगे नाव व पत्ता सांगितला. भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेतली असता घरात रिकामी पुगळी गोळी मिळून आली. त्याच प्रमाणे सदर सशयितावर 2012 मध्ये दरोडा पूर्व तयारीचा गुन्हा वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे समजले. विनापरवाना बेकायदेशीररित्या रिव्हॉल्व्हर बाळगल्या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.