घरमहाराष्ट्रनाशिकरुबेला लसीकरणाला अखेर ‘बुस्ट’

रुबेला लसीकरणाला अखेर ‘बुस्ट’

Subscribe

शहरात मुस्लिम धर्मगुरूंच्या आवाहनानंतर वाढली आकडेवारी

अनेक गैरसमजांमुळे मुस्लिम समाजाने गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेला पाने पुसली होती; परंतु मुस्लिम धर्मगुरू, समाजातील प्रतिष्ठीत नागरिक आणि डॉक्टरांमार्फत घरोघर जाऊन आणि मशिदींमध्ये प्रबोधन करण्यात आल्याने शहरातील लसीकरण ८४ टक्यांवर पोहोचले आहे. यापूर्वी लसीकरण ७० टक्यांपर्यंत झालेले होते. महत्वाचे म्हणजे मुस्लिम समाजातील बालकांचे लसीकरण ३९ टक्यांवरुन थेट ६४ टक्यांपर्यंत पोहोचले आहे.

शासनाच्या निर्देशांनुसार महापालिका क्षेत्रात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत महापालिका क्षेत्रातील नऊ महिने ते पंधरा वर्षांपर्यंतच्या ४ लाख ९० हजार बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी ८२.६६ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. मोहिमेचा रविवारी (दि. २०) शेवटचा दिवस होता; परंतु सर्व बालकांना लसीकरण करता यावे यासाठी मोहिमेची मुदत आणखी पाच दिवस वाढवण्यात आली आहे. गोवर- रुबेला लसीकरणाबाबत अनेक अफवा पसरल्याने उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांना लसीकरण करण्यास नकार दिला होता. महापालिका हद्दीतीलील ३५ शाळांमध्ये पंधरा वर्षाच्या आतील तब्बल १६ हजार ८४ मुस्लिम मुले शिक्षण घेतात. डिसेंबर अखेरपर्यंत यापैकी केवळ ६२९५ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले होते. त्यामुळे ही मोहिमच धोक्यात आल्याने पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पुढाकार घेत शहरातील मुस्लिम धर्मगुरु, मुस्लिम समाजातील नगरसेवक मान्यवर नागरिक तसेच उर्दू शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांची बैठक घेत लसीकरणासाठी आवाहन केले होते. आयुक्तांच्या या आवाहनाला उर्दू शाळांनी प्रतिसाद दिला असून लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १० हजार ४०० वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे ज्या दोन शाळांनी लसीकरण पथकाला शाळेच्या आवारात प्रवेश देण्यासही नकार दिला होता, त्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही लसीकरण करून घेण्यात येत आहे. पाच दिवसांत लसीकरणाची टक्केवारी ९० टक्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

पाच दिवसांची मुदतवाढ

आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील तब्बल ४ लाख ५ हजार २१४ बालकांचे लसीकरण करण्यात आले. या मोहिमेला आणखी पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -