शाळा ४ जानेवारीपर्यंत बंदच!

पालकमंत्री छगन भुजबळ यांचा निर्णय; जिल्ह्यातील ४२ शिक्षक ‘पॉझिटिव्ह

School

दीपावलीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा आढावा बैठक घेवून तत्कालिन परिस्थितीच्या आधारे पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही भुजबळांनी सांगितले आहे.

राज्यासह नाशिक जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सोमवार (दि. २३) पासून सुरु करण्याचे नियोजन होते. परंतु, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून दुसर्‍या लाटेची शक्यताही वर्तवली जात आहे. गेल्या तीन दिवसांत १४८ कोरोना रुग्ण वाढल्याने एकूण रुग्णांची संख्या दोन हजार ५५६ झाली आहे. विशेष म्हणजे यात ४२ शिक्षकांचाही समावेश आहे. ग्रामीण भागातील ३४ शिक्षक हे कोरोना पॉझिटिव्ह असून, अजूनही काही शिक्षकांचे अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. शिक्षकच कोरोनाबाधित असतील तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण आणि त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत शाळा सुरु न करण्यास शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुजबळ यांनी जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षकांची पुन्हा होणार तपासणी

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परिस्थिती बघून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांची पुन्हा कोरोना तपासणी करण्यात येईल. तसेच कोरोना सेंटर असलेल्या शाळांमधील हे सेंटर सुरुच ठेवण्यात येतील. आवश्यकता वाटल्यास अजूनही काही सेंटर नव्याने सुरु करण्याचा विचार सुरु असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.