नाशकात तिघांच्या आत्महत्या

Nashik
sucide
प्रातिनिधिक फोटो

नाशिक : शहरात दिवसेंदिवस एकटेपणा, प्रेमभंग, वाढत्या अपेक्षा, छळ व नैराश्यातून आबालवृद्धांमध्ये गळफास व विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याच्या घटनांत वाढ होत आहे. वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे कुटुंबीय व नातेवाईकांमध्ये चितेंचे वातावरण आहे. शहरात शुक्रवारी (ता.१३) एकाच दिवशी तीन जणांनी जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी अंबड व इंदिरानगर पोलीस ठाण्यांत नोंद करण्यात आली आहे. अमृता किशोर शिंपी (२०, रा.सिडको), धनश्री भाऊराव भोये (२१), अनिल साहेबराव पवार (३०, रा.कोपरगाव,नाशिक) यांनी आत्महत्या केल्या आहेत.

पहिल्या घटनेत, राहत्या घरी अमृता हिने कपडी दोरी छताच्या हुकाला बांधून गळफास घेतला. उपचारासाठी भाऊ अभिजित व वडील किशोर शिंपी यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिला वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भड करत आहेत.

हे देखील वाचा – मद्यधुंद टेम्पोचालकाची रिक्षाला धडक

दुसर्‍या घटनेत, धनश्री भाऊराव भोये हिने धर्मात्मा सोसायटी, कामटवाडा येथील राहत्या घरी फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. आत्महत्या करण्यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.

तिसर्‍या घटनेत, अनिल साहेबराव पवार (३०, रा.कोपरगाव,नाशिक) याने भंगार दुकानामध्ये लोखंडी कैचीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. आर. हादगे करत आहेत.