युतीचा १७ ला मनोमिलन मेळावा; सेनेला गटबाजीची चिंता

शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीचा उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांतील पदाधिकार्‍यांचा पहिला मनोमिलन मेळावा येत्या १७ मार्चला नाशिकमध्ये होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

Nashik
Shivsena_BJP

शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीचा उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांतील पदाधिकार्‍यांचा पहिला मनोमिलन मेळावा येत्या १७ मार्चला नाशिकमध्ये होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी शिवसेनेतील इच्छुकांचे मनोमिलन करतानाच पदाधिकार्‍यांना नाकीनऊ येत आहे. याचे पडसाद १७ ला होणार्‍या बैठकीतही उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

१७ ला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह किंवा गंगापूर रोडवरील चोपडा बँक्वेट हॉल येथे मनोमिलन बैठक घेण्याचे नियोजन सुरू आहे. या बैठकीत पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असा वाद पेटलेला दिसत नसून शिवसेनेत अंतर्गत गटबाजीलाच अधिक उधाण आले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी दररोज नवनवीन दावेदार पुढे येऊन आपल्या विजयाचे दावे करीत आहेत. उमेदवारीसाठी सुरू झालेली ही रस्सीखेच दूर होऊन मातोश्रीवर सर्व इच्छुकांचे मनोमिलन झाल्याचा दावा विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी करतानाच त्याबाबतचे उद्धव ठाकरे यांच्यासमवेतचे छायाचित्रही पुराव्यानिशी प्रसिद्धीस दिले. मात्र त्याच्याच दुसर्‍या दिवशी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी मात्र आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे जाहीर केल्याने तिढा वाढला आहे.

गोडसे, करंजकर यांच्यात उमेदवारीवरून सुरू असलेल्या वादात शिवाजी चुंभळे यांनीही मुंबईत जाऊन संजय राऊत यांची भेट घेतल्यामुळे एकीकडे मनोमिलनाचा दावा केला जात असताना दुसरीकडे इच्छुकांमधील बेबनावदेखील तितकाच चर्चेत आला आहे. या सर्व वादाचे पडसाद १७ मार्चला होणार्‍या बैठकीत उमटतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here