घरमहाराष्ट्रनाशिकदिंडोरी मतदारसंघात धक्कातंत्राचे संकेत

दिंडोरी मतदारसंघात धक्कातंत्राचे संकेत

Subscribe

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाल्यानंतर आता उमेदवार कोण असणार याविषयी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारांची नावे खुलदस्त्यात ठेवत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर करण्याची रणनिती आखली जात आहे.

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाल्यानंतर आता उमेदवार कोण असणार याविषयी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारांची नावे खुलदस्त्यात ठेवत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात धक्कातंत्राचा वापर करण्याची रणनिती आखली जात आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. नांदगाव, येवला, चांदवड, दिंडोरी, कळवण आणि निफाड अशा विधानसभा मतदारसंघांमध्ये व्यापलेल्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांच्याकडे आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ते या मतदारसंघाचे नेतृत्व करत असल्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. मात्र, धक्कातंत्र वापरण्यात माहीर असलेल्या भाजपने निवडणूकीपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात ही जागा चव्हाणांच्या हातातून निसटण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रत्येक जागा बहुमूल्य असणार्‍या भाजपने या जागेवरील उमेदवारीविषयी कमालीची गुप्तता राखली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: या जागेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याविषयी सोमवारी, ११ मार्चला मुंबईत बैठक घेऊन नवीन उमेदवाराचा शोध घेण्याच्या सूचना करण्यात आल्याचे समजते. तसेच हरिश्चंद्र चव्हाण यांना ग्रीन सिग्नल मिळालेला नसला तरी त्यांनी प्रचाराचे नियोजन सुरू ठेवले आहे.

- Advertisement -

ग्रामीण भागातील लग्न समारंभ, छोट्या-मोठ्या सोहळ्यांना हजेरी लावत त्यांनी प्रचाराचा धडाका कायम राखला आहे. त्यामुळे विद्यमान खासदार प्रचारात गुंतलेले आहेत. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत तिकीट मिळणार याची खात्री बाळगत त्यांनी ही रणनिती सुरू ठेवल्यामुळे किमान भाजपचा एकतरी उमेदवार प्रचाराच्या रणधुमाळीत दिसतो. त्या तुलनेत युतीचा धर्म निभावणारी शिवसेना मात्र, सुस्तावलेली दिसते. शिवसेनेच्या बळावरच या जागेचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे उमेदवाराचे चित्र स्पष्ट होईपर्यंत प्रचाराला अपेक्षित गती मिळणार नाही. त्याचप्रमाणे आघाडीच्या उमेदवाराविषयी हेच चित्र निर्माण झाल्याचे दिसून येते. दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने पक्षाकडून पाच वर्षे मेहनत घेतलेल्या डॉ. भारती पवार यांना कोड्यात टाकले आहे. अद्याप कोणताही उमेदवार निश्चित नसल्यामुळे दोघांनीही आशा सोडलेली नाही.

निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांची पळवापळवी होऊ नये, याची युती व आघाडीने पुरेपूर काळजी घेतलेली दिसते. त्यामुळे उमेदवाराचे नाव शेवटपर्यंत गुलदस्त्यात ठेवून अंतिम क्षणी माकपला जागा सोडण्याचे फर्मान आल्यास राष्ट्रवादीच्या इच्छुकांना धक्का दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या जागांमध्ये आपल्या कोट्यातून घटक पक्षाला जागा सोडावी लागणार असल्याने त्याही जागांचा विचार करावा लागेल. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अर्थात माकपने पालघर व दिंडोरीची जागा मागितली आहे. पालघरची जागा काँग्रेसने हितेंद्र ठाकूर यांना सोडल्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी झाली असून, दिंडोरीवर माकपने आपला दावा कायम ठेवल्यास उमेदवारीचे चित्र ऐनवेळी पालटू शकते. या सर्व परिस्थितीवर अंतिम क्षणापर्यंत लक्ष ठेवून असलेला भाजप शेवटच्या क्षणी उमेदवार बदलून धक्का देऊ शकते.

- Advertisement -

आमदार गावित रिंगणात

माकप महाआघाडीत सामील होण्याची चर्चा सुरु असतानाच कळवण-सुरगाण्याचे आमदार जीवा पांडू गावित यांनी स्वतंत्र चूल मांडत आपली उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे अनुसूचित जमातीसाठी राखीव दिंडोरी लोकसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. आमदार गावित यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराची अडचण होणार असून, भाजपमध्ये आनंदी वातावरण पसरले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाआघाडीने माकपला जवळ करत भाजप विरोधी मतांचे विभाजन रोखण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु केले होते. तथापि, आजच्या आमदार गावित यांच्या निर्णयाने अवघ्या मतदारसंघाची समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. आमदार गावित यांचा सुरगाणा, कळवण या मतदारसंघात मजबूत पकड आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत माकपच्या उमेदवाराने ७२ हजार मते मिळवली होती. त्यामुळे माकपच्या उमेदवाराचा फटका महाआघाडीच्या उमेदवाराला बसतो की, भाजपच्या उमेदवारा हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -