घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक दरोडा: सायरन वाजवल्यानेच सॅम्युअल यांचा बळी

नाशिक दरोडा: सायरन वाजवल्यानेच सॅम्युअल यांचा बळी

Subscribe

चारच दिवसांपूर्वी रुजू झालेल्या सॅम्युअलच्या मृत्यूची वार्ता समजताच कर्मचारी व ग्राहकांमधून हळहळ

सशस्त्र दरोडा पडलेल्या मुथूट फायनान्सच्या नाशिक कार्यालयात संगणक अभियंता संजू सॅम्युअल (३२, मूळ रा. केरळ) व कैलास जयन (२५, रा. मुंबई) या दोघांची मुंबईतून नुकतीच बदली झाली होती. ते दोघेजण सोमवारी (ता.१०) उंटवाडीतील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात रुजू झाले. चारच दिवसांत त्यांच्या कर्मचारी आणि ग्राहकांशी ओळखी झाल्या. कर्मचार्‍यांच्या सांगण्यानुसार सॅम्युअल हे मनमिळावू व कष्टाळू होते. ते नेहमी कार्यालयात काम करण्यात मग्न असायाचे. त्यांचे काम पाहून व्यवस्थापक देशपांडे यांनीसुद्धा कार्यालयात आता कोणत्याच तांत्रिक अडचणी येणार नाहीत, असेही कर्मचार्‍यांना विश्वासाने सांगितले. त्यानुसार सॅम्युअल यांनीही व्यवस्थापकासह कर्मचारी व ग्राहकांचा विश्वास पात्र ठरवला. चार दिवसांत एकही तांत्रिक अडचण आली नाही.

शुक्रवारी (ता.१४) सकाळी ९.३० च्या दरम्यान कॅशियरचे काम सुरू झाले. दरोडेखोर आले, त्यावेळी ते कॅशियर केबिनमध्येच काम करत होते. दरोडेखोरांनी लॉकर्सच्या चाव्या मागितल्या व तितक्यात सॅम्युअल यांनी फायनान्स कंपनीतील ठेवीदारांची रोकड व दागिने चोरट्यांच्या हाती लागू नये म्हणून सायरन वाजवला. सॅम्युअलने सायरन वाजवल्याचे दरोडेखोरांना समजताच एका दरोडेखोराने त्याच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला, असे प्रत्यक्षदर्शी कर्मचार्‍यांनी सांगितले. चारच दिवसांपूर्वी रुजू झालेल्या सॅम्युअलच्या मृत्यूची वार्ता समजताच कर्मचारी व ग्राहकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

वर्दळीच्या मार्गावरील थरार, नागरिकांत दहशत

त्रिमूर्ती चौक ते मायको सर्कल हा रस्ता सर्वाधिक वर्दळीचा आहे. असे असतानाही दरोडेखोरांनी बिहारप्रमाणेच भरदिवसा दरोडा टाकला. यावरून दरोडेखोरांना या भागाची व कार्यालयाची चांगली माहिती असावी, असे सांगितले जाते आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांची मोठी गर्दी केली होती. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीही होती. दिवसा-ढवळ्या दरोडा पडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

सॅम्युअल यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या

चेहरा झाकलेले दोन व इतर दोन असे चार दरोडेखोर कार्यालयात घुसले. त्यांनी सुरुतीला लॉकर्सच्या चाव्या मागत मोबाईल ताब्यात घेण्यास सुरुवात केली. दरोडेखोरांसोबत मॅनेजर देशपांडे यांची झटापट झाली. त्यात ते गंभीर जखमी झाले. सॅम्युअल यांनी सायरन वाजवल्याने दरोडेखोरांनी बंदुकीतून पाच राऊंड फायर केले. त्यातील तीन गोळ्या सॅम्युअल यांच्यावर झाडल्या. त्यानंतर चौघेजण पळून गेले. – युवराज पवार, प्रत्यक्षदर्शी ग्राहक

- Advertisement -

शहरात नाकेबंदी

दरोडेखोरांनी मुथूट फायनान्स कार्यालयातून बाहेर पडत फरार झाल्याने पोलिसांनी शहरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुन्हे शाखा पथकासह अन्य पोलीस पथके दरोडेखोरांचा माग काढत आहेत. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना नाकाबंदी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. घटनास्थळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, माधुरी कांगणे, लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस उपायुक्त अशोक नखाते यांच्यासह फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी, डॉग पथक, ब्लॅक कमांडो तत्काळ दाखले झाले. अधिकार्‍यांनी शास्त्रीय पद्धतीने पुरावे गोळा करत तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत.

सोशल मीडियावर पोलिसांवर रोष

शहरात दिवसेंदिवस घरफोडी, सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी अपेक्षा नाशिककर करत असताना शुक्रवारी दरोडेखोरांनी भरदिवसा वर्दळ असणार्‍या रोडवर दरोडा टाकला. या घटनेमुळे नाशिककरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नाशिककरांचा पोलिसांवरील विश्वास उडाला आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याने गुन्हेगारांची मजल वाढल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे. जनतेची सुरक्षा फक्त हेल्मेट व सीटबेल्ट होत नाही, तर गुन्हेगारांवर वचक ठेवल्यावरच जनतेची सुरक्षा होते. विश्वास नांगरे-पाटील नाशिकचे पोलीस आयुक्त झाल्याने गुन्हेगारी आटोक्यात येईल, असे सर्वांना वाटले. प्रत्यक्षात शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हे लावले जात आहेत. नाशिक शहरात नेमकं काय चाललंय, असा प्रश्न सध्या नाशिककरांना पडत आहे. एकीकडे शहरांमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे शहरातील गुंडांची मजल, आता थेट पोलीस कर्मचार्‍यांवर हात उचलण्यापर्यंत पोहोचली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील गुन्ह्यांचा आढावा घेतला, तर चोरी, घरफोडी, गाड्यांची तोडफोड, पोलिसांवरील हल्ले, अशा घटना कधी नव्हे त्या शहरात घडत आहेत, अशा अनेकांना सोशल मीडियावर पोस्ट अपलोड करत पोलिसांविरोधात रोष व्यक्त करत आहेत.

तपासासाठी नाकेबंदी, पथके रवाना

दरोडेखोरांचे वर्णन मिळाले आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सायरन वाजल्याने मुद्देमालचोरी झालेली नाही. शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून तपासणी सुरू आहे. पथके रवाने झाली असून उंटवाडी परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी केली जात आहे. – विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

शांतताप्रिय शहरात भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न व एका निष्पाप कर्मचार्‍याची हत्या निंदनीय आहे. या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना देणार असून वाढत्या गुन्हेगारीची तक्रार करणार आहे. तसेच नाशिकची शांतता अबाधित राखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याबाबत नियोजन करण्याचे आवाहन करणार आहे. पोलिसांनी या प्रकारात सहभागी असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे. – सीमा हिरे, आमदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -