घरमहाराष्ट्रनाशिकमोबाईलवर दिसणार 'स्मार्ट पार्किंग'ची दिशा

मोबाईलवर दिसणार ‘स्मार्ट पार्किंग’ची दिशा

Subscribe

वाहतुकीचा गुंता आणि टोइंगच्या जाचाला वैतागलेल्या नाशिककरांसाठी शहरातील 'स्मार्ट पार्किंग' दिशादर्शी आणि दिलासादायी ठरणार आहे.

वाहतुकीचा गुंता आणि टोइंगच्या जाचाला वैतागलेल्या नाशिककरांसाठी शहरातील ‘स्मार्ट पार्किंग’ दिशादर्शी आणि दिलासादायी ठरणार आहे. तुम्ही शहरात कुठेही असले तरी या तंत्रज्ञानामुळे त्या-त्या भागातील पार्किंगच्या जागा आणि तेथील उपलब्ध पार्किंगची संख्याही तुम्हाला मोबाईलवर अॅपद्वारे दिसणार आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नाशिक शहरात वेगवेगळ्या ३३ ठिकाणी ‘स्मार्ट पार्किंग’ प्रस्तावित असून, त्यापैकी शरणपूर रोड, गंगापूर रोड, पंडित कॉलनी, कॉलेज रोड भागात १५ ठिकाणी या पार्किंग सुरू झाल्या आहेत. प्रत्येक पार्किंगच्या प्रारंभी एक मोठा डिजिटल बोर्ड लावण्यात आला असून, त्यावर उपलब्ध दुचाकी आणि चारचाकी पार्किंगची आकडेवारी दिसते. पार्किंगसाठी ज्या जागा पांढऱ्या रंगाने रेखांकित करण्यात आलेल्या आहेत, त्यात सेन्सर लावलेले आहेत. या जागेत वाहन पार्क झाले की, उपलब्ध पार्किंगच्या संख्येत तेवढी घट तसा आकडे डिजिटल बोर्डवर दिसतो.

- Advertisement -

स्मार्ट पार्किंगद्वारे तब्बल ६ हजार वाहनांसाठी अधिकृत पार्किंगची जागा उपलब्ध होणार असल्याने, पार्किंगच्या समस्येची तीव्रता कमी होऊ शकेल. ही पार्किंग सशुल्क असली तरीही, टोइंगपोटी दंड भरून जो मनस्ताप होतो, तो टळू शकेल. दरम्यान, बी. डी. भालेकर आणि एम. जी. रोडवर अशा दोन ठिकाणी ऑफरोड पार्किंगच्या जागाही निश्चित करण्यात आल्या आहेत.

‘गेट-वे’ ठरणार दुवा

वाहनांचा डेटा सर्व्हरपर्यंत पोहोचविण्यासाठी पार्किंगच्या परिसरात पथदीपांवर सौरउर्जेवर चालणारे ‘गेट-वे’ बसविण्यात आले आहेत. या द्वारे सेन्सरकडून रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे प्राप्त होणारी माहिती सर्व्हरपर्यंत जाईल. तेथून ती अॅप्लिकेशन्सवर अपडेट होईल.

- Advertisement -

असे करा अॅप्लिकेशन डाऊनलोड

अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही मोबाईल स्टोअरवर स्मार्ट पार्किंगचे अॅप्लिकेशन उपलब्ध आहे. nashiksmartparking शब्द सर्च करुन अॅप डाऊनलोड करता येते. मोबाईल नंबर, ओटीपी टाकल्यानंतर हे अॅप सुरू होते. लोकेशन सुरू असल्यानंतर परिसरातील पार्किंग आणि उपलब्ध जागांची माहिती दिसते.

लवकरच होणार पूर्तता

शहरात ३३ ठिकाणे स्मार्ट पार्किंगसाठी निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील १५ ठिकाणी यंत्रणा उभी राहिली असून, लवकरच ती पूर्ण क्षमतेने सुरू होईल. शहराच्या दृष्टीने ही सुविधा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ठरेल. – प्रकाश थविल, सीईओ, नाशिक स्मार्ट सिटी कंपनी

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -