घरमहाराष्ट्रनाशिकसर्पमित्रांनीही काढला मागण्यांचा फणा

सर्पमित्रांनीही काढला मागण्यांचा फणा

Subscribe

सर्पमित्रांवर कारवाईचा बडगा उगारणार्‍या वन विभागाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सर्पमित्रांना सन्मानाने आमंत्रित केले आहे.

सर्पमित्रांवर कारवाईचा बडगा उगारणार्‍या वन विभागाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सर्पमित्रांना सन्मानाने आमंत्रित केले आहे. सभेत साप निघण्याच्या धास्तीने सभास्थळी शंभर सर्पमित्र तैनात केले जाणार आहेत. मात्र, आता सर्पमित्रांनीच आपल्या मागण्यांचा फणा काढला असून निदान सभेच्या निमित्ताने का होईना आमचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी सर्पमित्रांनी केली आहे.

पिंपळगाव येथे बाजार समिती कार्यालय लगतच्या जॉईंट फार्मिंग सोसायटीच्या मैदानावर २२ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. मोदींच्या सभेपेक्षा सध्या या परिसरात वास्तव्यास असलेल्या सापांचीच चर्चा अधिक घडू लागली आहे. मोदींची सभा होणार आहे, तो परिसर सापांच्या वास्तव्याचा मानला जातो. सुमारे ६८० एकरच्या या विस्तीर्ण मैदानाचा वापर होत नसल्याने मैदानावर कुरण वाढले आहे. त्यामुळे गावात कुठेही साप आढळला की तो पकडून या मैदानात सोडला जातो. त्यामुळे या मैदानाच्या परिसरात सापांचे माहेरघर असल्याचेही स्थानिक सांगतात. दोन दिवसांपूर्वी याच मैदानावर प्रत्यक्षात नागराजाने दर्शन दिल्याने या गोष्टीला अधिकच पुष्टी मिळाली. त्यामुळे प्रशासनाने सापांची चांगलीच धास्ती घेतली असून आता मोदींच्या सभेला सर्पमित्र तैनात करण्यात येणार आहे. याकरता पिंपळगाव व आसपासच्या गावातून सुमारे शंभर सर्पमित्रांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

- Advertisement -

या सभेच्या निमित्ताने का होईना सर्पमित्रांचे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वनविभागाच्या आदेशानुसार सर्प पकडणे गुन्हा ठरवण्यात आला आहे. एखाद्या सर्पमित्राने साप पकडून घरात ठेवला तरी त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो. सर्पमित्रांवर गुन्हे दाखल होत असल्याने सर्पमित्रांनी साप पकडणेच बंद केले आहे. त्यामुळे आपसूकच ही जबाबदारी वनविभागावर आली. वनविभागाकडे याकरता कोणतेही मनुष्यबळ वा यंत्रणा नाही. नागरिकांनी साप निघाल्यानंतर वनविभागाला फोन केल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर नाईलाजाने सर्पमित्रांना पाचारण करावे लागते. मोदींच्या सभेच्या निमित्ताने हाच मुद्दा आता पुढे आला आहे. एकीकडे साप पकडणे, त्याचे विष काढणे, घरात साप ठेवणे कायद्याने गुन्हा असताना आता मोदींच्या सभेसाठी याच सर्पमित्रांना प्रशासनाने मदतीसाठी आर्जव केली आहे. सर्पमित्रांनी आधी आपले प्रश्न सोडवा, अशी भूमिका घेतल्याने प्रशासनही कोंडीत सापडले आहे.

विशेष सुरक्षा दलाने घेतला ताबा

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील अतिमहत्वाच्या व्यक्तीं असल्याने सुरक्षेची जबाबदारी एसपीजी अर्थात भारत सरकारच्या गृह खात्याच्या विशेष सुरक्षा दलाकडे असते. नाशिक येेथे मोदींची सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या सभास्थळाचा ताबा या पथकाने घेतला आहे. आज दिवसभर या पथकाने मैदानाची पाहणी करत तयारीचा आढावा घेतला. मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोणतेही आंदोलन होऊ नये या दृष्टीने या पथकाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

- Advertisement -

 प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे

गेल्या अनेक वर्षांपासून सर्पमित्र आपल्या मागण्यांसाठी वनविभागाशी झगडत आहे. आम्हाला ओळखपत्र द्यावे, मानधन सुरू करावे, ड्रेसकोड द्यावा, अशी आमची मागणी आहे. मागण्या मान्य न करता नागरिकांच्या मदतीला धावून जाणार्‍या सर्पमित्रांवर थेट गुन्हे दाखल केले जातात. हा आमच्यावरचा अन्यायच आहे. त्यामुळे मोदींच्या सभेच्या निमित्ताने का होईना राज्यातील सर्पमित्रांच्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी आमची मागणी आहे. – राजेंद्र पवार, सर्पमित्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -