शिवसेनेतील इच्छुकांमध्ये ‘सोशल वॉर’

नाशिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीबरोबरचे मनोमिलन करणे दूरच; शिवसेनेला आपल्या इच्छुक उमेदवारांना रोखून धरणे अवघड झाले आहे. शिवसेनेच्या तीनही इच्छुकांनी समाज माध्यमांवर रान पेटवले असून तिघांनी या माध्यमातून उमेदवारीवर दावा केला आहे. त्यामुळे आता पक्ष काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

Nashik

नाशिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीबरोबरचे मनोमिलन करणे दूरच; शिवसेनेला आपल्या इच्छुक उमेदवारांना रोखून धरणे अवघड झाले आहे. शिवसेनेच्या तीनही इच्छुकांनी समाज माध्यमांवर रान पेटवले असून तिघांनी या माध्यमातून उमेदवारीवर दावा केला आहे. त्यामुळे आता पक्ष काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

युतीच्या जागा वाटपात आजवर नाशिकच्या जागेवर शिवसेनेनेच दावा सांगत निवडणूक लढवली आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेनेला त्यात यशही मिळाले आहे. गेल्या निवडणुकीत हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव केल्यामुळे तर शिवसेनेसाठी ही जागा आणखीनच महत्त्वाची झाली आहे. त्यामुळे यंदाही या जागेवरून शिवसेनाच उमेदवारी करेल हे स्पष्ट असले तरी, उमेदवारीबाबत अजूनही तर्कवितर्क वर्तविले जात आहेत. नाशिक लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व सध्या हेमंत गोडसे करीत असल्याने त्यांचा उमेदवारीवर दावा असणे स्वाभाविक आहे. किंबहुना त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. दुसरीकडे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. आपल्यालाच श्रेष्ठींनी शब्द दिल्याने यंदा उमेदवारीवर आपलाच दावा आहे, असे सांगत त्यांनी मोर्चबांधणी सुरू केली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी गोडसे, करंजकरांसह पदाधिकार्‍यांना पाचारण केले. त्यात पक्षप्रमुख अंतिम कौल देतील, असे मानले जात असताना दोन्ही गटाने एकमेकांची उणीदुणीच काढल्याने वाद शमण्याऐवजी त्यात वाढच झाली.

चला इतिहास घडवू या : गोडसे

खासदार हेमंत गोडसे यांच्या फेसबुक वॉलवर ‘चला इतिहास घडवू या’ असे संदेश सचित्र टाकण्यात आले आहेत. गर्दीसमोर ते भाषण करीत असलेल्या फोटोला ‘पैसा नाही भावा, माणसं कमवतो आम्ही’ असे कॅप्शन देऊन जणू शक्तीप्रदर्शनच करण्यात आले आहे. ‘शिवसेना तयार, भ्रष्ट नेतृत्वाविरुद्ध लढण्यासाठी’ अशी पोस्ट व्हॉटसअ‍ॅप आणि फेसबुकवर टाकत गोडसे यांनी उमेदवारीवर दावा केला आहे.

गोडसेंचे प्रयत्न फोल

अंतर्गत ‘वॉर’ शमवण्यासाठी मध्यंतरी हेमंत गोडसे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत करंजकर व अन्य नेत्यांचे एकत्र काढलेले छायाचित्र समाजमाध्यमातून प्रसिद्ध करून मनोमिलन झाल्याचा दावा केला होता. मात्र, त्यानंतरही करंजकर आणि चुंभळे समर्थकांमधून उमेदवारीवर दावा करणार्‍या पोस्ट टाकल्या जात असल्याने गोडसे यांचे प्रयत्न फोल ठरल्याचे स्पष्ट झाले.

ये तो सिर्फ झाकी है : करंजकर

विजय करंजकर यांची म्हाडाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ‘ये तो सिर्फ झाकी है, खासदार होना बाकी है’ असे संदेश व्हायरल केले. ‘या भगव्यावरची श्रद्धा कधी ढळली नाही आणि ढळणारही नाही’, असे भावनिक संदेशही करंजकरांकडून पोस्ट केलेे जात आहेत. महत्वाचे म्हणजे बहुसंख्य पोस्टवर भावी खासदार असाच उल्लेख आहे. यातील बहुतांश पोस्टवर शिवसेनेचे धनुष्यबाणाचे चिन्हही वापरण्यात आले आहे.

एकमेकांच्या पेजमध्ये घुसखोरी

शिवसेनेतील तीनही इच्छुकांमध्ये सोशल वॉर रंगलेला असताना एकमेकांच्या पोस्ट खालील प्रतिक्रियेच्या जागेत घुसखोरी केली जात आहे. गोडसेंच्या फेसबुक पेजवर करंजकर समर्थक संदेश टाकताना दिसतात. करंजकरांच्या पेजवर गोडसे समर्थकांचे संदेश वाचायला मिळतात. अशाच प्रकारे शिवाजी चुंबळे यांच्या पोस्टचाही सर्वत्र ‘संचार’ आहे.

खुप झाले आजी-माजी आता फक्त शिवाजी : चुंभळे

शिवाजी चुंभळे यांनी, ‘खुप झाले आजी-माजी आता फक्त शिवाजी’ असा संदेश देत थेट खासदार गोडसे यांच्यावर शरसंधान साधले आहे. ‘जनतेशी आघाडी माझी, जनतेशी माझी युती, जनता जर्नादन पाठीशी, मज काय कुणाची भीती’ ही पोस्ट आपण कुणालाही घाबरत नसल्याची जाणीव करुन देणारी आहे. संसदेच्या चित्रापुढे लक्ष २०१९ चा उल्लेख करणार्‍या पोस्टही त्यांनी व्हायरल केल्या आहेत. मात्र, या पोस्टवर पक्षाचे चिन्ह नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here