घरमहाराष्ट्रनाशिकस्थायी समिती सभापती : भाजपने वापरले मराठा कार्ड

स्थायी समिती सभापती : भाजपने वापरले मराठा कार्ड

Subscribe

संभाजी राजेंनी रचला पाया चंद्रकांत दादांकडून कळस

शहरातील तिनही आमदारांनी आपापल्या निकटवर्तीयांसाठी जीवाचे रान केलेले असताना आणि दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांच्या जवळचा सदस्यही सभापतीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असताना भारतीय जनता पार्टीने सभापतीपदाची माळ चर्चेत नसलेल्या उद्धव निमसे यांच्या गळ्यात टाकली. अर्थात आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने निमसेंच्या रुपाने ‘मराठा कार्ड’चा वापर केल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. या उमेदवारीसाठी खासदार संभाजीराजे भोसले यांनी आग्रह धरला. नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्याने उमेदवारीचा ‘राजेंनी रचला पाया, दादांनी चढवला कळस’ असेच म्हणावे लागेल.

महापालिकेतील मलाईदार समिती म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्थायीसाठी अनेकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजपच्या नऊ सदस्यांपैकी सात सदस्यांना उमेदवारीचे डोहाळे लागले होते. त्यामुळे पक्ष श्रेष्टींनाही उमेदवारीवर शिक्कामोर्तब जिकरीचे जात होते. त्यातच शहरातील तीनही आमदारांनी आपापल्या निकटवर्तीयांची नावे पुढे करून उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. दुसरीकडे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपले जवळचे गणेश गिते यांना उमेदवारीचा शब्द दिल्याची चर्चा होती. त्यामुळे याच इच्छुकांवर महापालिकेतील अन्य सदस्यांनी लक्ष केंद्रित केले होते. प्रत्यक्षात तीनही आमदारांना बाजूला सारत उमेदवारीसाठी स्वत:च ‘जातीने’ प्रयत्न करणार्‍या उद्धव निमसे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती होणे ही बाब निमसे यांच्या पथ्यावर पडल्याचे एकूणच राजकीय हालचालींचा आढावा घेतला असता स्पष्ट होते. निमसे हे चंद्रकांत पाटलांचे निकटवर्तीय आहे. शिवाय खासदार संभाजीराजे भोसले यांनी देखील निमसेंसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकला.

- Advertisement -

महापालिकेतील ‘मराठा लॉबी’ निमसे यांच्या पाठीशी सक्षमपणे उभी राहिल्याने या सर्वांचा परिपाक म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली. त्यातून पालकमंत्र्यांना मिळणार्‍या अवास्तव महत्वाला नवनियुक्त पक्षाध्यक्षांनीच काही प्रमाणात लगाम लागल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्या निकटवर्तीयांनाच महत्वाची पदे बहाल केली जात असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून झडत होती. सानप हे वंजारी समाजाचे असून पदे देताना त्यांचा याच समाजाकडे अधिक कल असल्याचा आरोप केला गेला. कमलेश बोडके यांना सदस्यपद दिल्यानंतरही हाच ‘जातीवाद’ पुढे आला होता. वंजारी समाजाच्या सदस्याला उमेदवारी मिळाल्यास संपूर्ण मराठा समाज नाराज होऊ शकतो, असा अंदाज बांधत अखेर ‘मराठा कार्ड’ चालवण्याचा निर्णय श्रेष्टींनी घेतला. विधानसभा निवडणुकीत हे ‘कार्ड’ उपयुक्त ठरेल, असे पक्षाच्याच नगरसेवकांनी सांगितले.

बाळासाहेबांचा मार्ग सुकर?

पूर्व मतदार संघातून भाजपच्या वतीने उद्धव निमसे यांनीही दावा केला आहे. मराठा समाजाचा उमेदवार, जनसंपर्क आणि आर्थिक सुबत्ता याबाबी लक्षात घेता पक्षाला निमसेंकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते. स्थायी सभापतीपदाची संधी निमसेंना मिळाल्यास ते विधानसभेची उमेदवारी मागणार नाहीत, असा शब्दच त्यांच्याकडून सोडवून घेतल्याचे बोलले जाते. त्यामुळे या उमेदवारीमुळे सानप यांचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा आहे; परंतु निमसे यांची महत्वकांक्षा बघता ते विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा दावा ठोकतील असा अंदाज त्यांचेच निकटवर्तीय वर्तवत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -