घरमहाराष्ट्रनाशिक‘स्थायी’वरुन भाजपमध्ये रणकंदन

‘स्थायी’वरुन भाजपमध्ये रणकंदन

Subscribe

प्रियंका घाटेंचा राजीनाम्याचा इशारा;  पुंडलिक खोडेही संतप्त

महापालिकेची आर्थिक नाडी म्हणून ओळख असलेल्या स्थायी समिती सदस्यपदी वर्णी लागावी म्हणून केलेल्या मोर्चेबांधणीत अपयश आल्याने संतप्त झालेल्या नगरसेविका प्रियंका घाटे यांच्या समर्थकांनी भाजपच्या गटनेत्यांसह अन्य पदाधिकार्‍यांना खडेबोल सुनावत राजीनामा देण्याची तयारी सोमवारी (दि. २४) झालेल्या महासभेदरम्यान दर्शवली. नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याची तयारीदेखील प्रियंका घाटे यांनी दाखवली. दुसरीकडे भाजपचेच पुंडलिक खोडे यांनीही, ‘एससी, एसटी नगरसेवकांना जाणीवपूर्वक टाळल्या’चा आरोप करीत पदाधिकार्‍यांना घरचा आहेर दिला. महासभा सभागृहाबाहेर हा वाद सुरु असताना महापौरांनी मात्र आठ सदस्यांची नावे घाईगर्दीत जाहीर करीत सभा अटोपती घेतली. या घाईत नवनियुक्त सदस्यांच्या सत्काराच्या सोपस्काराचे भानही महापौरांना उरले नाही.

स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी सोमवारी दुपारी २ वाजता महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्यात आली होती. प्रभाग क्रमांक २२ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे जगदीश पवार हे निवडून आल्याने भाजपचे संख्याबळ कमी झाले आहे. याशिवाय पंचवटीतील नगरसेविका शांताबाई हिरे यांच्या निधनामुळे आणखी एक सदस्य कमी झाला आहे. त्यामुळे शिवसेनेने तौलनिक संख्याबळाकडे अंगुलीनिर्देश करीत स्थायी समितीत सेनेच्या एका सदस्याची अधिक नियुक्ती करावी अशी मागणी सभागृहात विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी केली. या जागेसाठी त्यांनी प्रभाग क्र. २१ च्या नगरसेविका ज्योती खोले यांच्या नावाची शिफारस केली होती. मात्र महापौरांनी सुधाकर बडगुजर व सत्यभामा गाडेकर या दोघांच्याच नावांची घोषणा सदस्य म्हणून केली. या निर्णयाविरोधात आपण शासनाकडे धाव घेणार असल्याचे बोरस्ते यांनी महासभेनंतर स्पष्ट केले.

- Advertisement -

काय झाले सभागृहात आणि सभागृहाबाहेर?

महासभा सुरु झाल्यानंतर महापौरांनी सदस्यांची नावे येण्यासाठी दहा मिनीटांची मुदत दिली. मात्र त्याच दरम्यान, पीठासनाच्या बाजूच्या दरवाजाबाहेर प्रियंका घाटे यांचे समर्थकांनी भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांना घेराव घालत घाटे यांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप केला. एरवी आंदोलने आणि सभांच्या गर्दीची जबाबदारी आमच्यावर टाकली जाते, पक्षासाठी आम्ही लोकांना अंगावर घेतो पण पक्ष आमचा विचारच करीत नाही, असे सुनावत रोशण घाटे यांनी प्रियंका घाटे यांचा राजीनामा देण्याचा इशारा दिला. याच वेळी भाजपचे नगरसेवक पुंडलिक खोडे हे देखील संतप्त होत एससी आणि एसटी सदस्यांना पदे देताना जाणीवपूर्वक टाळले जाते असा आरोप केला. वाद वाढत असल्याचे लक्षात आल्यावर जगदीश पाटील, नगरसेवक मुकेश शहाणे आणि गिरीष महाजन यांचे स्वीय सहायक स्वप्नील नन्नावरे यांनी समजूत घालून पुढील वर्षी आपल्याच नावाचा विचार केला जाईल, असे सांगितले.

.. अन् राहिला नवनियुक्त सदस्यांचा सत्कार !

सदस्यपदावरुन बाहेर गोंधळ होत असल्याचे पाहून महापौरांनी घाईगर्दीत आठ सदस्यांची नावे घोषित केले आणि राष्ट्रगीत सुरु करण्याची सूचना केली. राष्ट्रगीत झाल्यावर नवनियुक्त सदस्यांचे सत्कार करण्याचे राहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण विरोधकांनी सभा संपल्यावर सत्कार करु नये अशी मागणी केल्याने सत्काराविनाच नवनियुक्त सदस्यांना सभागृहाबाहेर जावे लागले. दरम्यान, प्रियंका घाटे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी महापौरांच्या रामायण निवासस्थानी जाऊनही नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रारंभी त्यांनी उपमहापौर भिकूबाई बागूल यांच्याशी चर्चा केली.

- Advertisement -

स्थायी समिती सदस्यपदासाठी मी इच्छुक होते. परंतु पक्षाने मला जाणीवपूर्वक डावल्याची माझी भावना आहे. महापौरांकडे मी नगरसेवकपदाचा राजीनामा घेऊन गेले होते. मात्र त्यांनी समजूत काढली. मंगळवारी (दि. २५) आम्ही आ. गिरीश महाजन यांना भेटणार आहोत. त्यानंतर राजीनाम्यासंदर्भात निर्णय घेऊ. – प्रियंका घाटे, नगरसेविका

 

 

‘स्थायी’वरुन भाजपमध्ये रणकंदन
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -