घरमहाराष्ट्रनाशिकभटक्या कुत्र्याच्या पायात शस्त्रक्रियेव्दारे स्टिलचा रॉड

भटक्या कुत्र्याच्या पायात शस्त्रक्रियेव्दारे स्टिलचा रॉड

Subscribe

भटक्या कुत्र्याच्या मोडलेल्या पायात स्टिलचा रॉड टाकून त्याला ठणठणीत बरे करण्याचे काम नाशिकमधील पशु वैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर्सने केले आहे.

माणसाचा हात किंवा पायाचे हाड तुटल्यावर त्यात स्टिलचा रॉड टाकून तो पूर्ववत केला जातो. पण भटक्या कुत्र्याच्या मोडलेल्या पायात स्टिलचा रॉड टाकून त्याला ठणठणीत बरे करण्याचे काम नाशिकमधील पशु वैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर्सने केले आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीत एक कुत्रा विव्हळत असल्याचे येथील उद्योजक प्रशांत कुलकर्णी यांनी मंगलरुपगोवत्स सेवा ट्रस्टचे पुरुषोत्तम आव्हाड यांना कळविले. पुरुषोत्तम आपले मित्र शुभम भडांगे यांच्यासह तातडीने सांगितलेल्या परिसरात दाखल झाले. तेव्हा लक्षात आले की, एका भटक्या कुत्र्याच्या पायावरुन वाहन गेले आहे. कुत्र्याला जखम झाली नव्हती. मात्र त्याच्या पायाचे हाड तुटलेले होते. त्यामुळे ते जीवाच्या अकांताने ओरडत होते. पुरुषोत्तमने तातडीने त्याला अशोक स्तंभावरील प्राण्यांच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉ. सचिन वेंदे आणि डॉ. संदीप पवार यांनी त्याची तपासणी केली. पायाचा एक्सरे काढला. तेव्हा निदान झाले की, त्याच्या पायाचे हाड तुटले आहे. प्लास्टर करुनही हे हाड जुळणे अवघड होते. त्यामुळे माणसांच्या पायात ज्याप्रमाणे स्टिलचा रॉड टाकला जातो, तसा रॉड या कुत्र्याच्या पायात शस्त्रक्रीयेव्दारे टाकण्यात आला. भुल उतरेपर्यंत त्याला गोशाळेत आणण्यात आले होते. त्याला पुरुषोत्तम यांनी खाऊ-पिऊ घातले. काही क्षणात ते झोपी गेले. दोन-अडीच तासांनंतर पुरुषोत्तम पुन्हा गोशाळेत आले तेव्हा या कुत्र्याने पायात टाकलेला रॉड चक्क वाकवून ठेवला होता. दुसर्‍या दिवशी पुन्हा शस्त्रक्रिया केल्यानंतर ही बाब पुढे आली. परंतु नव्याने शस्त्रक्रीया न करता आधीचाच रॉड कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे हा वाकलेला रॉड पायात अशा रितीने फिट बसला की आता हा कुत्रा चारही पायावर दुडूदुडू पळू लागला आहे.

- Advertisement -

मदतीसाठी संपर्क साधा

रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या प्राण्यांची आमची संस्था सुश्रूषा करते. भटक्या कुत्र्याच्या पायात रॉड टाकण्याची शस्त्रक्रीया नाशिकमध्ये प्रथमच झालेली आहे. सोडलेली जनावरे किंवा भटक्या कुत्र्यांच्या मदतीसाठी ९०२८१७५८१७ या क्रमांकावर संपर्क साधावा. – पुरुषोत्तम आव्हाड, मंगलरुप गोवत्ससेवा संस्था

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -