घरमहाराष्ट्रनाशिक‘मुक्त’च्या ‘पीएच.डी.’ चे विद्यावेतन बंद!

‘मुक्त’च्या ‘पीएच.डी.’ चे विद्यावेतन बंद!

Subscribe

विद्यापीठाचा निर्णय: संशोधक विद्यार्थ्यांना दरमहा 25 हजारांचा फटका

शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणार्‍या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सुरू केलेल्या अर्धवेळ नियमित पीएच. डी. संशोधन शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे २५ हजार रुपये विद्यावेतन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पूर्णवेळ अभ्यासक्रमास मान्यता दिलेली असताना मुक्त विद्यापीठाने हा अभ्यासक्रम अर्धवेळ करत विद्यावेतन बंद करून विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेतल्याने संशोधकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मुक्त विद्यापीठाने 2015 मध्ये एम. फिल आणि पीएच. डी. हे दोन संशोधन शिक्षणक्रम सुरू करत उच्च शिक्षणाचे प्रवेशद्वार खुले केले. यूजीसीने निर्देशित केल्यानुसार अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, दूरशिक्षण, वाणिज्य, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र व पर्यावरणशास्त्र या विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी प्रवेश देण्यात येतो. प्रवेशासाठी विद्यापीठातर्फे प्रवेश पात्रता परीक्षा (पेट) घेतली जाते. चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांनी 21 एप्रिल रोजी ही परीक्षा दिली. या परीक्षेत पात्र ठरलेल्या 187 उमेदवारांची प्राथमिक गुणवत्ता यादी विद्यापीठाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे यातून पात्र ठरणार्‍या विद्यार्थ्यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी पीएच. डी. साठी प्रवेश घेतल्यानंतर प्रबंध पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला देण्यात येणारे 25 हजार रुपये विद्यावेतन विद्यापीठाने बंद केले आहे. 2015 मध्ये पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना हे विद्यावेतन मिळत होते. त्यानंतर वर्षभरातच विद्यावेतन कमी करून 8 हजार रुपये केले. आता तर काहीच मिळणार नसल्यामुळे मुक्त विद्यापीठातून पीएच. डी. करणार्‍या विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

- Advertisement -

पीएच.डी.च्या मागे शुक्लकाष्ट

मुक्त विद्यापीठात पीएच.डी साठी प्रवेश घेतात, त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, हा मलिदा मिळवण्यासाठी संशोधनाकडे वळणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यानेही ही पीएच.डी. बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र पुन्हा एकदा पीएच.डी.साठीचे विद्यावेतन बंद करुन विद्यापीठाने विद्यार्थ्यांची नाराजी ओढावून घेतली आहे. पीएच. डी.साठी प्रत्येक संशोधकाला विषयानुरूप 30 हजारापासून ते लाख, दीड लाखापर्यंत खर्च करावे लागतात.

अर्धवेळ संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात येत नाही

यूजीसीने मान्यता दिलेल्या पीएच. डी. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्धवेळ नियमित अभ्यासक्रम असल्यामुळे संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात येत नाही. यापूर्वी पूर्णवेळ अभ्यासक्रम असल्यामुळे 25 हजार रुपये विद्यावेतन दिले जात होते. -डॉ. दिनेश भोंडे, कुलसचिव, मुक्त विद्यापीठ, नाशिक.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -