घरमहाराष्ट्रनाशिकनिवडणुकीतील ‘अंदर की बात’

निवडणुकीतील ‘अंदर की बात’

Subscribe

असंख्य घडामोडींमुळे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले

लोकसभा निवडणुकीत नाशिक आणि दिंडोरीत पडद्यामागच्या हालचालींनाही जोर आलेला दिसतो. विविध संघटनांचे समर्थन मिळवण्यासाठीची चढाओढ, आपल्या पदाधिकार्‍यांची मोट बांधतांना युती आणि आघाडीची होणारी धावपळ, अपक्ष उमेदवारांनी फोडलेला घाम आणि त्यांना साथ देणारे अन्य पक्षातील पदाधिकारी, मोदींच्या सभेला गर्दी होऊ नये म्हणून विरोधक करत असलेले प्रयत्न, राज ठाकरेंना उघडे पाडण्यासाठी युतीच्या वतीने सुरू असलेला प्रयत्न या आणि अशा असंख्य घडामोडींमुळे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

तीन उमेदवारांकडून उद्योजक ‘लक्ष्य’

नाशिक लोकसभा मतदारसंघातील प्रमुख तीनही उमेदवारांनी उद्योजकांसमवेत बैठका घेतल्या. सुरुवातीला समीर भुजबळ यांच्यासाठी झालेल्या बैठकीला १३ उद्योजक उपस्थित होते. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी घेतलेल्या बैठकीला ७५ उद्योजक उपस्थित होते. रविवारी २१ एप्रिलला एक्सप्रेस इन येथे हेमंत गोडसे यांनी बोलविलेल्या बैठकीला १०० पेक्षा अधिक उपस्थित होते. अर्थात उपस्थित असणारे संबंधितांना मते देतीलच असे नाही. उपस्थितांपैकी काहींनी उमेदवारांचे मत जाणून घेण्यासाठी बैठकीला येण्यास पसंत केले. काहींना उमेदवारांच्या समर्थकांनी वारंवार संपर्क साधत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

साप म्हणून भूई थोपाटणे

पिंपळगाव बसवंत येथे सोमवारी २२ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. काळे कपडे, ड्रोन, शेतीची अवजारे आदी आनण्यास सभेत मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे ही सभा चर्चेत आहे. त्यातच ही सभा मोठ्या कुरणाच्या जागेत घेण्यात येणार आहे. परिसरात साप पकडल्यास तो या कुरणात सोडला जातो. त्यामुळे आपसूकच येथे सापांची संख्या वाढली आहे. आता हेच साप भाजप आणि प्रशासनासाठी त्रासदायक ठरत आहेत. महत्वाचे म्हणजे साप म्हटले तरी लोक गर्भगळीत होत असल्याने विरोधकांनी आता सापांच्या सुरस ‘दंतकथा’ सांगायला सुरुवात केली आहे. जेणेकरुन सापांची दहशत वाढून त्याचा परिणाम सभेच्या गर्दीवर होईल.

इडीची धास्ती; खर्चाला कात्री

यंदाच्या निवडणुकीत सक्त वसुली संचलनालयाची (इडी) जबरदस्त धास्ती उमेदवारांना आहे. पैशांचा वारेमाप वापर केल्यास इडीची धाड कधी पडेल याचा नेम नाही, अशी भीती प्रत्येकाला वाटत आहे. म्हणूनच यंदा एका सर्वार्थाने ‘तगड्या’ उमेदवाराने खर्चाला मोठीच कात्री लावल्याची चर्चा आहे. जेवणा-खावणाबरोबरच पार्ट्यांना पैसे मिळत नसल्याने काही कार्यकर्त्यांनी प्रचारालाच ‘जय महाराष्ट्र’ केल्याचे ऐकिवात आहे.

- Advertisement -

देणग्यांच्या बाबतीत हात आखडता

लोकसभा निवडणुकीच्या काळात येणार्‍या सण-समारंभांकडे उमेदवारांचे विशेष लक्ष असते. जयंती उत्सव साजरा करणार्‍या मंडळांना यंदा एका उमेदवाराकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, या अपेक्षा फोल ठरवत या उमेदवाराने देणगी देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे कळते. त्यामुळे उत्सव समितीतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाल्याचे बोलले जाते.

पक्षांचा घात अन् अपक्षांना साथ

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या वतीने हेमंत गोडसे यांचा प्रचार केला जात असला तरीही प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांचे काही पदाधिकारी माणिकराव कोकाटे यांचा प्रचार करीत असल्याचे बोलले जाते. दुसरीकडे काँग्रेसचीही काही मंडळी राष्ट्रवादीच्या प्रचारात दिसलेली नाही. निष्ठावंत समजले जाणारे काँग्रेस कमिटीतील एक गृहस्थ कोकाटेंच्या प्रचारासाठी अनेकांना फोनवर संपर्क साधत असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येते.

‘लावा रे व्हिडिओ’ उलटवण्याचा प्रयत्न

राज ठाकरेंच्या सभांनी सत्ताधार्‍यांना हैराण करून ठेवले आहे. ‘लावा रे व्हिडिओ’ असा आवाज सभेतून आला तरीही या मंडळींना धडकी भरते. आता ‘लावा रे व्हिडिओ’ हीच टॅगलाईन वापरून राज यांचा पर्दाफाश करण्याचे नियोजन भाजप-शिवसेनेने केलेले आहे. राज यांनी २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या चित्रफिती सध्या जमा करण्याचे काम सुरू आहे. राज यांच्या २६ एप्रिलला होणार्‍या सभेपूर्वी युतीच्या वतीने या क्लिपचा मारा केला जाणार आहे.

भाजप निती समजण्यास अडचणी

दिंडोरी लोकसभा मतदार संघात युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास पक्षाचे काही पदाधिकारी प्रयत्नच करत नसल्याचे समजते. राष्ट्रवादीतून आयात केलेल्या या उमेदवारालाही भाजपची निती समजण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रचारादरम्यान नक्की काय घडामोडी होत आहे याची त्यालाही स्पष्ट कल्पना नसल्याचे दिसते.

डबे घेऊन आघाडीचा प्रचार

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास फारसे कार्यकर्ते उत्सूक नसल्याचे बोलले जाते. हा उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर खर्चही करायला तयार नाही. त्यामुळे काही पदाधिकारी दररोज नाशिकमधून जेवणाचा डबा दिंडोरीत घेऊन जातात.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -