सावित्रीबाई फुले विद्यापीठ उपकेंद्रात विद्यार्थ्यांचा ठिय्या

वाणिज्यच्या तृतीय वर्षातील ‘एम लॉ’ विषयाचा निकाल लांबणीवर

Nashik
DSC_0040
सावित्रीबाई फुले विद्यापीठ उपकेंद्रात विद्यार्थ्यांचा ठिय्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेतील 52 टक्के विद्यार्थी ‘एम. लॉ.’ या एकाच विषयात अनुत्तीर्ण झाले असून, या अनपेक्षित निकालाची तपासणी करून सुधारित निकाल जाहीर करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने नाशिक उपकेंद्रात ठिय्या आंदोलन केले. उपकेंद्राचे समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांचे दालन बंद करून विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला.

वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांचा 7 जून रोजी बी. कॉमचा निकाल जाहीर झाल्यानंतर एम. लॉ. विषयात नाशिक जिल्ह्यातून तब्बल 52 टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. विशेष म्हणजे हे विद्यार्थी इतर सर्व विषयांत चांगल्या गुणांनी उतीर्ण आहेत. तसेच इतर विषयांमध्ये प्रथम श्रेणी मिळवली आहे. असे असताना एकाच विषयात मोठ्या संख्येने विद्यार्थी नापास झाल्याने पेपरची पुनर्तपासणी करण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत 30 जून रोजी सुधारित निकाल लावण्याचे आश्वासन विद्यापीठाने दिले होते. मात्र, निर्धारित वेळेत निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनासमोर आंदोलन केले होते. यानंतर रिव्हॅल्यूवेशनची लिंक ओपन करून देण्यात आली. मात्र, लिंक ओपन केल्यानंतर विद्यार्थ्यांचे पेपरच तपासले गेले नाही.

10 जुलै उजाडूनही निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराविरोधात बुधवारी ठिय्या आंदोलन केले. दुपारी 3 वाजता पोलिसांनी याप्रकरणात हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी भूमिकेवर ठाम होते. यावेळी नगरसेवक गजानन शेलार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस श्रेयांश सराफ, जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, कार्याध्यक्ष आकाश कदम, भुवनेश राऊत, अतुल डुबरेपाटील, चेतन व्यवहारे, ललित मानकर, गौरव सोनार, अक्षय दाते, कमलेश काळे, श्लोक भागवत आदी उपस्थित होते.