कर्जाला कंटाळून तरुण शेतमजुराची आत्महत्या

बागलाण तालुक्यातील गोराणे येथील घटना

Nashik
jaykheda sucide
शेतमजूर किशोर उत्तम देसले

दुष्काळामुळे गावात काम मिळत नसल्याने नैराश्य व कर्जाला कंटाळून बागलाण तालुक्यातील गोराणे येथील ३३ वर्षीय शेतमजूर किशोर उत्तम देसले यांनी आनंदपूर येथील शेतकरी शंकर पाटील यांच्या शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जायखेडा पोलिसांत अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

या पावसाळ्यात मजुरांच्या हाताला कामे नसल्याने आधीची मजुरी तर नाहीच; पण आता कामेही नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. किशोर देसले गोराणे येथील रहिवासी आहेत. शेतीवाडी काहीच नसल्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. यामुळे गावात मिळेल ते काम किशोर देसले करत होते. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. किशोर रात्रभर घरी आलाच नाही यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी गुरुवार (११ जुलै) सकाळी त्यांची शोधाशोध करत असताना आनंदपूर येथील शेतकरी शंकर पाटील यांच्या शेतातील विहिरीत किशोर यांचा मृतदेह आढळून आला.

यावेळी पोलीसपाटील दिलीप पाटील यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळविली. पंचनामा करून किशोरचा मृतदेह वरती काढण्यात आला. दरम्यान, नामपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.