नाशिक, दिंडोरीबाबत सस्पेन्स कायम

पहिल्या यादीत भुजबळांचे नाव जाहीर न करणे ही बाब उमेदवाराच्या चाचपणीवर शिक्कामोर्तब करणारी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्‍या यादीकडे लक्ष; इच्छुकांमध्ये संभ्रम

Nashik
Nashik_Dindori

भुजबळ कुटूंबियांपैकीच एकाला लोकसभेची उमेदवारी मिळणार अशी स्पष्टोक्ती दस्तुरखुद्द छगन भुजबळ यांनी काही दिवसांपुर्वी केली होती. त्यामुळेे आता उमेदवारी जाहीर करण्याची औपचारिकता तितकी बाकी आहे असे बोलले जात असताना राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत भुजबळ यांचे नाव जाहीर न झाल्याने अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत. पहिल्या यादीत नाव जाहीर न करणे ही बाब उमेदवाराच्या चाचपणीवर शिक्कामोर्तब करते. दिंडोरी मतदार संघाच्या उमेदवारीच्या बाबतीतही सस्पेन्स कायम आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी १४ मार्चला बारा मतदारसंघासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असली तरी यात नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाचा समावेश नाही. यामुळे पक्षाकडून या मतदारसंघात अद्यापही चाचपणी सुरू असल्याचे दिसून येते. एकवेळ दिंडोरी मतदारसंघात उमेदवारीवरून पक्षांतर्गत स्पर्धा असल्याचे समजू शकते. मात्र, नाशिकच्या जागेबाबतचे सर्वाधिकार भुजबळांकडे असताना त्यातही या मतदारसंघात भुजबळ परिवारातीलच एक सदस्य निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले असतानाही नाशिकच्या जागेबाबतही सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक आणि दिंडोरीच्या जागेबाबत राष्ट्रवादी सावध पावले टाकत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात नाशिक, दिंडोरी हे दोन्ही प्रमुख मतदारसंघ तर धुळे लोकसभा मतदारसंघात तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात आलेला आहे. ’राष्ट्रवादी’ला सोडण्यात आलेल्या मतदारसंघात नाशिकमध्ये शिवसेना तर दिंडोरीत भाजपशी प्रमुख सामना आहे.

गेल्या वेळी या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीला पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे यावेळेस या दोन्ही जागावर राष्ट्रवादीने ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. नाशिक मतदारसंघात आपली उमदवारी गृहीत धरून माजी खासदार समीर भुजबळ यांनी गेल्या काही महिन्यांपासून जोरदार तयारी सुरू केली आहे; परंतु एकूणच समीर यांच्यासाठी मतदारसंघातील वातावरण अनुकूल नसल्याचा सूर पक्षातून उमटत असल्याने छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र, भुजबळ यांनी याबाबत स्पष्ट नकार देत ‘भुजबळ’च मैदानात असतील असे सांगत नावाबाबत सस्पेेन्स कायम ठेवला. नाशिक दौर्‍यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही नाशिकबाबतचे सर्वाधिकार भुजबळांना दिले आहेत. पवारांच्या दौर्‍यानंतर समीर भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जाते. या दौर्‍यात समीर भुजबळ यांनी पवारांच्या गाडीचे सारथ्य केले. तसेच मंचावरही त्यांना शेजारी बसवण्यात आले; परंतु समीर भुजबळ यांच्यावर इडीच्या कारवाईचे मळभ अद्याप दुर झाले नसल्याने पक्षातून अन्य नावाबाबत विचार सुरू असल्याचे समजते. यातून छगन भुजबळ यांच्या स्नुषा शेफाली समीर भुजबळ यांचे नावही पुढे आले आहे. एकूणच नाशिकबाबत अद्याप छगन भुजबळ निष्कर्षाप्रत न आल्यानेच की काय अद्याप नाशिकच्या नावाबाबत संभ्रम कायम असल्याचे दिसून येते. त्यातच सोशल मीडियावरून व्हायरल होत असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या संभाव्य यादीमुळे इच्छुकांसह, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था वाढली आहे.

दिंडोरीचा तिढा कायम

गेल्या वेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवणार्‍या जिल्हा परिषद सदस्या डॉ. भारती पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. पण, महाले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने तसेच त्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्याने डॉ. भारती पवार यांचा पत्ता कट झाल्याचीही पक्षात जोरदार चर्चा आहे. अर्थात यामागे घरातील अंतर्गत वाद असल्याची चर्चा आहे. दरम्यान, डॉ. पवार या भाजपच्या संपर्कात असून विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट झाल्यास त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

उमेदवारीस नीलिमा पवारांचा नकार

भुजबळ यांच्याऐवजी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे. ‘आपलं महानगर’ने नीलिमा पवार यांच्याशी संपर्क साधला असता निवडणुकीत उमेदवारी करण्याचा माझा विचारच नसल्याचे त्यांनी सांगितले. मुळात आपले पती माजी खासदार डॉ. वसंत पवार हे राष्ट्रवादीचे होते. परंतु आपण या पक्षात प्रवेश केलेलाच नाही. त्यामुळे उमेदवारीचा प्रश्नच उदभवत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here