रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असताना शहरात दहशत निर्माण करणार्‍या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास पोलिसांनी रविवारी (दि.८) दुपारी दीड वाजेदरम्यान सापळा रचून अटक केली. नागसेन नगर, व्दारका येथील मुस्तकीन रेहमान शेख ऊर्फ मुज्जा असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तडीपार गुन्हेगार शहरात वावरताना दिसून आल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तरीही, तडीपार गुन्हेगार रात्री-अपरात्री नजर चुकवून बेकायदेशीर नाशिक शहरात वावरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय पोलिसांनी पोलीस ठाणे व पोलीस चौकीबाहेर तडीपार गुन्हेगारांचे फोटो व नाव असलेले फलक लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसंनी गुन्हेगारांचे नावासह फोटो व तडीपार कालावधी प्रत्येक पोलीस ठाणे व पोलीस चौकीबाहेर लावले आहेत. मुस्तकीन शेख हा व्दारका परिसरात दहशत पसरवित असल्याची माहिती एका जागृक व्यक्तीने पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली.