घरमहाराष्ट्रनाशिकसंत निवृत्तीनाथ पालखी सोहळा रोखण्याचा माजी अध्यक्षांचा इशारा

संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा रोखण्याचा माजी अध्यक्षांचा इशारा

Subscribe

रथाला बैलजोडी जोडण्यावरून विश्वस्तांमध्ये मतभेद

संत निवृत्तीनाथ पंढरपूर पालखी सोहळ्याबाबत यावर्षी विश्वस्त मंडळांच्या निर्णयांमुळे सुरू असलेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. आधी नाशिक शहरातील मुक्काम रद्द करून पळसे येथे हलवण्यावरून सुरू असलेला वाद थांबतो ना थांबतो, तोच आता रथ व नगार्‍याच्या बैलगाडीसाठी बैल निवडण्यावरून विश्वस्त मंडळात दोन गट पडले आहेत. संस्थान अध्यक्षांनी मनमानी थांबवली नाही, तर पालखी सोहळा रोखण्याचा इशारा माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड यांनी दिल्याने वारकरी चिंतेत आहेत.

त्र्यंबकेश्वरचे संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर येथून दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला पंढरपूरकडे पालखी सोहळ्याचे प्रस्थान होते. या पालखीसोहळ्यात हजारो वारकरी सहभागी होतात. या पालखी सोहळ्याचे काही नियम व परंपरा निश्चित असून त्याप्रमाणे दरवर्षी वाटचाल होत असते. मात्र, नवे अध्यक्ष पंडित महाराज कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा पालखी सोहळ्याचा २६ दिवसांचा कालावधी कमी करण्यासाठी नाशिक येथील शेकडो वर्षांची परंपरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. नाशिकमधील संत नामदेव मंदिरात पालखीचा मुक्काम असतो. येथील वैशिष्ठ्ये म्हणजे या भागातील मुस्लीम बांधव वारकर्‍यांना सुविधा उपलब्ध करून देतात. सामाजिक व धार्मिक एकोप्याच्या दृष्टीने हा मुक्काम महत्वाचा असताना विश्वस्त मंडळाने परस्पर तो रद्द केला होता. यावरून उठलेले वादळ शमले असतानाच अध्यक्ष व सचिवांनी बैलजोडीबाबतही मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचा काही विश्वस्तांचा आरोप आहे. परंपरेनुसार पालखी सोहळा प्रमुख पुंडलिकराव थेटे व माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड यांनी जिल्हाभरात फिरून इच्छुक वारकर्‍यांच्या बैलजोडींची पाहणी करून अहवाल सादर केला.

- Advertisement -

अध्यक्ष व सचिवांनी त्यांच्या मर्जीतील शेतकर्‍यांच्या बैलजोड्या घेण्याचा प्रयत्न केला; परंतु बैठकीस उपस्थित बैलजोडी मालकांनी आठ दिवसांपूर्वी या निर्णयाला विरोध केला. यामुळे बैठक रद्द करीत नंतर निर्णय घेण्याचे जाहीर केले. याबाबत शनिवारी (दि.१८) विश्वस्त मंडळाच्या बैठकीत दिंडी सोहळा प्रमुखांच्या अहवालाकडे दुर्लक्ष करीत चिठ्ठ्या टाकत अध्यक्ष व सचिवांच्या मर्जितील बैलजोड्यांची निवड केली. या प्रकाराचा माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, विश्वस्त ललिता शिंदे, रामभाऊ मुळाणे यांनी निषेध केला आहे. या प्रकाराबद्दल सोमवारी (दि.२०) जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली जाणार असून वारकरी परंपरेचा मान न ठेवणार्‍या अध्यक्ष, सचिवांचा निषेध म्हणून दिंडी सोहळा रोखणार असल्याचे त्यांनी ‘आपलं महानगर’ला सांगितले.

नको त्या विषयात वाद घालू नये

पालखी सोहळा समितीने सुवलेल्या आठ बैलजोड्यांमधून चिट्ठी टाकून दोन बैलजोड्यांची निवड करण्यात आली आहे. दिंडी सोहळा प्रमुख पुंडलिकराव थेटे यांनीही हा निर्णय स्वीकारला आहे. नको त्या विषयात वाद घालू नये, असे वाटते. – पंडित महाराज कोल्हे, अध्यक्ष, संत निवृत्तीनाथ समाधीमंदिर संस्थान.

- Advertisement -

समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष

पालखीच्या रथासाठी बैलजोडी निवडण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालाकडे दुर्लक्ष करून काही मंडळींनी हितसंबंध जोपासले आहे. यातून वारकरी परंपरेला फाटा देण्यात आला आहे. यामुळे या निर्णयाविरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार आहे. – त्र्यंबकराव गायकवाड, माजी अध्यक्ष, संत निवृत्तीनाथ समाधीमंदिर देवस्थान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -