घरमहाराष्ट्रनाशिकआरतीसाठी सरकार ३० लाखांचा निधी देणार

आरतीसाठी सरकार ३० लाखांचा निधी देणार

Subscribe

गोदावरी नदीच्या आरतीसाठी भाजप सरकार ३० लाखांचे निधी देणार आहे.

नाशिककरांचे जीवन अखंडितपणे प्रवाही करणार्‍या गोदामाईने शहराला तीर्थक्षेत्र म्हणून ओळख दिली आहे. ही नदी धार्मिकदृष्ठ्या महत्वपूर्ण आहेच; शिवाय तिच्या पाण्यात आता निवडणुकीचे राजकीय तरंगदेखील उमटू लागले आहेत. म्हणूनच यंदा शिवसेनेसह काँग्रेसने निवडणूक प्रचाराचा प्रारंभ गोदा आरतीने केला आहे. भाजपनेही आता यात उडी घेतली असून गोदावरीकडे लक्ष केंद्रीत करीत हरिद्वाररच्या धर्तीवर नदीच्या आरतीसाठी तब्बल तीस लाखांचा निधी मंजूर केला आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत खर्च केला जाणार आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून आरतीला सुरुवात होईल. आरतीसाठी निधी देण्याची ही राज्य सरकारची पहिलीच वेळ आहे.

अशी सुरु झाली आरतीची परंपरा

हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरीची आरती करण्याची संकल्पना गेल्या पंधरा वर्षांपासून मांडली जात आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तत्कालीन महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर पुरोहित संघाच्या वतीने गोदावरीची नित्यनेमाने आरती सुरू झाली. मात्र निधीचा आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे तिला भव्य-दिव्य स्वरुप मिळू शकले नाही. त्यानंतर ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक अर्थात तानने आरतीचा उपक्रम सुरू केला. नाशिकमध्ये आलेल्या प्रतिष्ठीत पाहुण्यांच्या हस्ते आरती करण्याची प्रथा त्यांनी रुढ केली. शिवाय काही स्वयंसेवी संस्था विशेषत: पर्यावरण प्रेमी मंडळी आपला वाढदिवस नदीची आरती करुन साजरा करतात; परंतु हरिद्वार, प्रयाग आणि काशीच्या धर्तीवर महाआरती आजवर कधी झालीच नाही. मध्यंतरीच्या काळात शिवसेना आणि काँग्रेसने गोदावरीची आरती करून निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती करण्याचे नियोजन सुरू आहे. या पार्श्वभूमिवर राज्य सरकारनेही आरतीच्या ‘पवित्र कार्यात’ उडी घेतली असून त्यासाठी ३० लाखांचा निधी मंजूर केला आहे. यात आरतीचे साहित्य, आरतीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठीची जागृती यांवर खर्च करण्यात येणार आहे. या आरतीचे माध्यमांमध्ये ब्रॅण्डींग देखील करण्यात येणार आहे.

हरिद्वार, प्रयागराज या ठिकाणी होणार्‍या आरतीला भाविक मोठया संख्येने हजेरी लावत असतात. ही बाब लक्षात घेऊन नाशिकच्या गोदा आरतीचे विपणन करण्याची संकल्पना मांडण्यात आली. त्यात आता पर्यटक वा नागरिकांना सहभागी होता येणार आहे. या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या माध्यमातून गोदाआरती सुरू करण्यात येणार आहे.
– नितीन मुंडावरे, प्रादेशिक अधिकारी, राज्य पर्यटन विकास महामंडळ

- Advertisement -

पुढील आठवड्यात निविदा

प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत ३० लाखांचा निधी गोदावरी आरतीसाठी मंजूर झाला आहे. आरतीची जबाबदारी कंत्राटदार संस्थेला दिली जाणार असून पुढील आठवड्यात निविदा काढण्यात येणार आहे.

गोदावरीची महाआरती कशासाठी

  • नदीचा सन्मान करणे
  • आरतीमुळे नदीच्या पावित्र्याची भावना लोकमनावर अधिक ठळकपणे अधोरेखित होऊन नदी प्रदूषित करण्यास कोणी धजावणार नाही
  • पर्यटन विकासाला चालना मिळेल
  • लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर सत्ताधार्‍यांना मतदारांचा कौल मिळेल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -