मेरे जुनूँ का नतीजा ज़रूर निकलेगा

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा शायराना अंदाज ः मालेगाव करोनामुक्तीचा निर्धार

Nashik

हमारे जुनूँ का नतीजा ज़रूर निकलेगा। इसी सियाह समंदर से नूर निकलेगा.. हा शायरी अंदाज आहे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचा. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई, पुण्यानंतर हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात पाचशे रूग्ण करोनामुक्त झाले असून, लवकरच मालेगाव करोनामुक्त होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी खास शायरी अंदाजात व्यक्त केला.

राज्यात करोनाचा कहर सुरूच असून, मालेगाव शहरातही करोनाने पाय घट्ट रोवले. मालेगाव करोनामुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सुरूवातीपासूनच कठोर पाऊले उचलली. मात्र, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे जिल्हाधिकारी मांढरे यांनी थेट मालेगावमध्येच मुक्काम ठोकला. दाट लोकवस्ती, करोनाविषयी गैरसमज, अपुर्‍या आरोग्य सुविधा अशा विविध संकटांचा सामना करताना करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला. मात्र, अधिकारांचे विभाजन करून प्रत्येक अधिकार्‍यावर विशिष्ट जबाबदारी निश्चित करून उत्तम नियोजन आणि नागरिकांच्या सहकार्याने आज मालेगावमधील परिस्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे. आजमितीस संपूर्ण जिल्ह्यात ८९१ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ६५४ रूग्णांनी करोनावर मात केली आहे. विशेष करून संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मालेगावमध्ये तर ६८५ पैकी ५०४ रूग्ण बरे झाले असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

मालेगावमधील दैनंदिन पूर्वपदावर आणणे हा आमचा प्राधान्यक्रम असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. कोरोनाशी दोन महिन्यांपासून जनता लढा देत आहे. प्रशासनासोबतच नागरिकांच्या सकारात्मकतेमुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळाला आहे. रमजानसारख्या पवित्र महिन्यामध्ये इतिहासातील सर्वात मोठ्या सामाजिक संकटाचा मुकाबला करताना बर्‍यापैकी यश मिळाले असून, येथील नागरिकांचा चांगल्या आरोग्य सुविधेसोबतच रोजगार व अन्नधान्याचा प्रश्न शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयांमुळे सुटणार आहे. लवकरच शहरातील पॉवरलूम सुरू करण्यात येणार असून हाताला काम मिळालेले निराश मने उभारी घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कन्टेन्मेंट झोन मर्यादित
जिल्ह्यातील १८६ कंटेनमेंट झोनपैकी ११९ कंटेनमेंट झोन एकटया मालेगांव शहरात आणि ग्रामीण भागातमध्ये होते. त्यामुळे मालेगाव महापालिका हददीचा रेड झोनमध्ये सामावेश करण्यात आला.मात्र शासनाने कंटेनमेंट झोनबाबत दिलेल्या निर्देशानूसार कंटेनमेंट झोन मर्यादित करण्यात आले. शहरात तर पूर्वी करोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर तो संपुर्ण परिसर सील केला जात होता मात्र आत केवळ रूग्ण राहत असलेली इमारतच सील केली जाते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही कंटेनमेंट झोन मर्यादित करण्यात आले आहे. त्यानूसार मालेगांवमध्ये आता ११९ वरून ४५ कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे कन्टेन्मेंट झोन व्यतिरिक्त भागातील जनजीवन पुर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here