घरताज्या घडामोडी‘आरटीई’प्रवेश प्रक्रियाही लॉकडाऊन

‘आरटीई’प्रवेश प्रक्रियाही लॉकडाऊन

Subscribe

पालकांची चिंता वाढली: शिक्षण विभाग म्हणते, पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणारच!

नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांसाठी मार्चमध्ये केंद्रीभूत पध्दतीने निघालेल्या सोडतीनंतर प्रवेश प्रक्रियाच लॉकडाऊन झाली आहे. आरटीई प्रवेश केव्हा सुरु होतील, याविषयी पालकांना आता चिंता वाटू लागली असून, तोपर्यंत शाळा तर सुरु होणार नाही ना? अशी भीतीही काही पालकांनी व्यक्त केली. याविषयी शिक्षण विभागाने योग्य खूलासा करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
‘आरटीई’ अंतर्गत इंग्रजी माध्यम शाळांमध्ये इयत्ता पहिली व नर्सरीसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. जिल्ह्यातील 447 शाळांमध्ये पाच हजार 557 जागांसाठी तब्बल 17 हजार 630 अर्ज प्राप्त झाले होते. या सर्वांची ऑनलाईन सोडत दि.17 मार्च रोजी काढण्यात आली. 2020-21 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात नेमकी केव्हा होईल, याबाबत सध्या ठोसपणे काहीच सांगता येत नाही. त्यामुळे शाळांची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. शाळा स्तरावरील प्रवेश ऑनलाईन स्वरुपात केले जात असले तरी ‘आरटीई’ प्रवेशांचे काय? याविषयी आता पालकांना चिंता वाटू लागली आहे. जे विद्यार्थी प्रवेशास प्रात्र ठरले आहेत, त्यांच्या पालकांना मोबाईलवर प्रवेशाचा एसएमएस दोन महिन्यांपूर्वी प्राप्त झाला होता. ज्यांना एसएमएस प्राप्त झालेला नाही, त्यांचा प्रतिक्षा यादीत समावेश झाल्याचे दिसून येते. परंतु, 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे त्यापुढील प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. दरम्यान, शाळांनी त्यांच्या स्तरावरील प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु केल्यामुळे प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे.‘आरटीई’च्या माध्यमातून प्रवेश मिळण्याची खात्री कमी होत असल्याने अनेक पालकांनी आता मिळेल त्या पध्दतीने प्रवेश घेण्याची तयारी सुरु केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना 31 मेपर्यंत सुटी असल्यामुळे शाळा सुरु झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्यानंतर तरी प्रवेश सुरु करण्याची मागणी पालक करत आहेत.

पालकांनी चिंता करु नये
आरटीई प्रवेश प्रक्रिया रद्द झालेली नाही. प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळनी करुन प्रवेश दिला जाणार आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर शासनाचे निर्देश प्राप्त होताच पुढील प्रवेश प्रक्रिया सुरु केली जाईल. त्यामुळे पालकांनी चिंता करु नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -